राजकारण

अद्याप देशाची वाटचाल नेहरुंच्याच पुण्याईवर; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. आजही मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही आपला देश नेहरुंच्याच पुण्याईवर चालला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपला टोले लगावले. वर्षे जात असतात. पण नेहरु ते राजीव गांधी आणि मनमोहन सिंगांपर्यंतचा लेखाजोखा पाहिला तर नेहरुंच्याच पुण्याईवर हा देश उभा असल्याचं दिसून येतं. नेहरु ते मनमोहन सिंगांपर्यंतच्या सरकारांनी अनेक योजना आणल्या. अनेक प्रकल्प उभे केले आहे. त्यामुळे देशाची जडणघडण झाली. मागच्या या पुण्याईवर देश चालला आहे, असं राऊत म्हणाले.

सरकारला लोक बहुमताने निवडून देतात. याचा अर्थ लोकांचा सरकारवर विश्वास आहे. मात्र, देशात आजही महागाई आहे. बेरोजगारी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली अराजकता आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात. सर्वांना अदानी, अंबानी बनायचे नसते. त्यांना रोजगार हवा असतो. उत्तम आरोग्य आणि शिक्षण हवे असते. गेल्या सात वर्षात आपण जनतेला हे देऊ शकलो का? याचं मोदी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. मोदींकडे नेतृत्व क्षमता आहे. ते देशाला योग्य दिशा देतील, जनतेला योग्य मार्ग दाखवतील याची आजही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मोदींना अजून बरंच काही करणं बाकी आहे, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button