Top Newsराजकारण

संजय राऊतांचे भाजपवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप; किरीट आणि नील सोमय्यांना अटक करा !

सोमय्यांवर शेलक्या भाषेत टीका आणि जाहीर आव्हान

मुंबई: शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र नील सोमय्या यांच्यावर बॉम्ब टाकले आहेत. पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं अ‍ॅक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल..आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला २० कोटींचा निधी गेला असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे.

ईडी वाले सुनो. सीबीआयवाले सुनो.सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची.. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

वाधवानला ब्लॅकमेल केलं !

मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं. आणि त्याला लुबाडलं. आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. १०० कोटी घेतले. लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त ४.४ कोटी रुपयांनी केली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सोमय्या. निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्याला अटक करा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? आणि हा भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे.. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शरद पवार, उद्धव ठाकरेंचा आम्हाला आशीर्वाद

सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. आम्हाला संदेश द्यायचा आहे… मराठी माणूस बेईमान नाही… तुम्ही कितीही नामर्दानगी करून पाठीमागे वार केलेत, तरी शिवसेना घाबरणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आजची पत्रकार परिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पाहत आहेत. त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

किरीट सोमय्या ‘मुलुंडचा दलाल’

बाळासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला.. आयुष्यभराचा मंत्र आहे.. तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका… आज उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत… भाजपचे काही प्रमुख लोक मला भेटले…तीन वेळा भेटले. त्यांनी मला वांरवार हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासोबतच संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा ‘मुलुंडचा दलाल’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार असं म्हटलं आहे.

मराठी भाषेविरोधात हा दलाल कोर्टात गेला; किरीट सोमय्यांवर घणाघात

संजय राऊत यांच्याकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला गेला. यावेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली. सोमय्या हा माणूस मराठीचा द्वेष करतो. या सोमय्याने मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. महाराष्ट्रात मराठी सक्ती नको म्हणून हा माणूस पुढे आला होता आणि हाच माणूस भाजपचा प्रमुख नेता आहे. आधी याचे थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार, अशी विचारणा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

…तर मी राजीनामा देईन; संजय राऊतांचे किरीट सोमय्यांच्या आरोपांना आव्हान

महाराष्ट्र, प. बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचे काम सुरु आहे. तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका नाहीतर आम्ही तुमचे सरकार घालवू अशा धमक्या दिल्या जातायत. भाजपाचे नेते महाराष्ट्रात १७० एवढ्या बहुमताचे सरकार असूनही दर दोन दिवसांनी आता हे सरकार जाईल, उद्या जाईल असे वक्तव्य करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

ईडीच्या कार्यालयात दही खिचडी

पीएमसीचा तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो. ईडी भ्रष्ट आहे. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावा आहे, असंही ते म्हणाले.

मुंबई आयोजित विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही पत्रकार परिषद आंतरराष्ट्रीय असून, शिवसेनेचे अनेक येथे माझ्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्याविरोधात रणशिंग फुंकणे आवश्यक असून, शिवसेना भवनाच्या ऐतिहासिक वास्तूपासून सुरुवात करतोय, असे संजय राऊत यांनी नमूद केले.

आम्हाला ही पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घ्यायची होती. परंतु सुरूवात शिवसेना भवनातून करू आणि अंत ईडीच्या कार्यालयासमोर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ईडीकडून भल्या पहाटे महाराष्ट्रातील माझ्या, काँग्रेस आणि पवारांच्या घरांवर रेड टाकली जाते. हे केवळ महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून चालेले षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

…तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल

नवी दिल्लीत असताना भाजपचे काही प्रमुख नेते मला भेटले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार लवकरच पडणार आहे. भाजपवाले रोज नवीन तारखा सांगतात, आता १० मार्चची तारीख दिली आहे. कुणाच्या जीवावर तारखा सांगतात. भाजप नेते म्हणतात की, एकतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल किंवा महाविकास आघाडीतील काही आमदार आमच्यासोबत घेऊन आमचे सरकार स्थापन केले जाईल. तुम्ही यामध्ये पडू नका. अन्यथा ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाइट आणि फिक्स करतील, अशा आशयाची धमकी दिली. मात्र, याला मी सक्त विरोध केला. त्या दिवसानंतर माझ्या आणि माझ्या जवळच्या व्यक्तींवर ईडीने धाडी टाकण्यास सुरुवात केली, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे परिवारासह आनंद अडसूळ, रवींद्र वायकर, अनिल परब, भावना गवळी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली. इतकेच नव्हे, तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरही छापेमारी केली. या सर्व प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले त्यांना मी ओळखतो. त्यांनी मला वारंवार या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. राष्ट्रपती राजवट आणायची आहे. हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार हाताशी लागले आहेत. जर तुम्ही बधला नाहीत तर केंद्रीय यंत्रणा तुमच्या लोकांना टाईट करण्यासाठी तयार आहेत. यावर मी म्हणालो, हरकत नाही तुम्ही काहीही करू शकता, असे मी त्यांना म्हणालो, असे राऊत यांनी सांगितले.

सध्या पवार कुटुंबावर भारी पडतायत, त्यांनाही आम्ही टाईट करणार आहोत. शरद पवारांच्या नातेवाईकांच्या घरांवर धाडी पडू लागल्या. मी तेव्हा त्यांना नाही म्हणालो, तेव्हा त्याच्या तिसऱ्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून माझ्या नातेवाईकांवर धाडी पडू लागल्या. याच्या आधी मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन आता संजय राऊतांना अटक होणार, इथे धाड पडणार, असे सांगत होता. तुम्ही काहीही करा, हे सरकार पडणार नाही असे जेव्हा जेव्हा मी त्यांना सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर, मित्रांवर धाडी पडू लागल्या. गेल्या काही वर्षांपासून भाजपाने नालायक पणा सुरु केला आहे. आम्ही कधी उत्तर दिले नव्हते. आता लोकांसमोर सत्य समोर येऊद्या, मग आपण पाहू असे उद्धव ठाकरेंचे आदेश असल्याचे राऊत यांनी सांगितले.

दलाल म्हणाला ठाकरे कुटुंबाने कोराईला १९ बंगले बांधून ठेवलेत, असा आरोप केला होता. त्याला माझे आव्हान आहे, आपण चार बसेस करू तिथे पिकनिक करू. तिथे तुम्हाला बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, नाही दिसले तर त्याला जोड्याने मारायचे. जाऊ तिथे पार्टी करू. मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी जो माणूस कोर्टात जातो, त्याच्याकडून ही अपेक्षा का करता, असा सवाल त्यांनी भाजपाला केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ म्हणता मग याचे आधी तोंड बंद करा, असेही राऊत म्हणाले.

कर्जतमधील कथित जमीन खरेदी प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निशाणा साधला होता. रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये ८ एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावं उभी केली. ही कमाल उद्धव ठाकरेच करु शकतात. उद्धव साहेब जबाव दो, असं आव्हानच सोमय्या यांनी केला होता. या आरोपावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

पाटणकर यांनी कुठलिही देवस्थानची जमीन खरेदी केली नाही. पाटणकरांनी देवस्थानची जमीन कुठे विकत घेतली हे दाखवा… पाटणकर आणि देवस्थानाचा काहीही संबंध नाही. २०१४ साली सलिम बिलाखियाकडून ही जमिन घेतली, त्यानंतर एकामागे एक अशी १२ जणांनी ही जमीन खरेदी केली. त्यात, १२ व्या नंबरला पाटणकर यांनी ही जमीन खेरदी केल्याचं राऊत यांनी सांगितलं. या बारा जणांची नावे राऊत यांनी सांगितली. देवस्थानाकडून आम्ही कशाकरता जमिनी खरेदी करू? असा सवालही त्यांनी केला आहे.

राऊतांनी घेतले देवेंद्र फडणवीसांचे नाव, त्यांचा फ्रंटमॅन कोण?

पत्रकार परिषदेच्या शेवटच्या क्षणी राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. फडणवीस यांचा एक फ्रंटमॅन आहे, मोहित कंबोज, असा आरोप संजय राऊत यांनी करताना या कंबोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी, प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे. तसेच हा कंबोज एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचा गौप्यस्फोटही केला आहे.

मोहित कंबोज यांनी १२ हजार कोटींची जमीन केवळ १०० कोटींना विकत घेतली आहे. त्या जमिनीवर त्याचा प्रकल्प सुरु आहे. यात पीएनबीचे पैसे गुंतलेले आहेत. ही जमिन एवढ्या कमी पैशांना कशी मिळाली याचा इतिहास मी तुम्हाला देणार आहे. किती कंपन्या स्थापन केल्या, त्याची माहिती देणार आहे. हे कसे झाले हे देवेंद्र फडणवीसांना चांगले माहिती आहे. त्यांनीच याचे उत्तर द्यावे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा

संजय राऊतांनी भाजपवर मोठा घोटाळ्याचा आरोप केला. फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. राऊत म्हणाले की, भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

‘त्या’ रात्री अमित शाहांना कॉल !

माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला गेला. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल मी त्यांना विचारला होता.

काही दिवसांपूर्वी मला भाजपचे काही नेते दिल्लीत भेटले. राज्य सरकारच्या प्रवाहातून तुम्ही बाहेर पडा. राज्यातलं सरकार पाडण्यासाठी आमची तयारी झाली आहे, असं त्यांनी मला सांगितलं. त्यावर बहुमत नसताना तुम्ही सरकार कसं पाडणार, असा सवाल मी त्यांना विचारला. त्यावर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू किंवा काही आमदार फोडू, असं उत्तर त्यांनी दिलं. राज्य सरकारला नख लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर पुढल्या काही दिवसांत माझ्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीच्या धाडी पडू लागल्या, असा घटनाक्रम राऊतांनी सांगितला.

तुरुंगात जाणारे भाजपचे ‘ते’ साडे तीन लोक कोण?

पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक कोठडीत असतील, असं राऊत म्हणाले होते. त्यामुळे भाजपचे ते साडे तीन लोक कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना भवनातून बाहेर पडताना राऊतांनी या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यावर ते लोक कोण हे उद्यापासून कळेल आणि ते आत गेल्यावर मोजत बसा असं उत्तर राऊत यांनी दिलं. त्याआधी शिवसेना भवनातील पत्रकार परिषद संपून राऊत खुर्चीवरून उठतानाही त्यांना हा प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते साडे तीन लोक आहेत. त्यातला कोणी अर्धा आहे, कोणी पाव आहे, तर कोणी चार आण्याचा असल्याचं विधान राऊत यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button