Top Newsराजकारण

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आ. संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर

२८ डिसेंबररोजी निवडणूक; आवाजी मतदानामुळे एकतर्फी निकाल!

मुंबई: अखेर येत्या आठवड्याभरात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी बाजी मारतात की विरोधक याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. येत्या २८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. २७ डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. आमदारांना फोडण्यात विरोधक यशस्वी ठरल्यास सरकार डळमळीत होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढून सरकार पाडण्यासाठीच्या हालचालीही होऊ शकतात. त्यामुळेच नियमावलीत बदल केला असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून ४ नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदा संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर अशोक चव्हाण या पदासाठी इच्छूक नसल्याचं समजतं. नितीन राऊत यांनाही ऊर्जा खातं सोडायचं नसल्याने अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे येत्या २७ डिसेंबर रोजी थोपटे अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे. सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून संग्राम थोपटे यांना ओळखलं जातं. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार म्हणून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटे कुटुंबाची सत्ता आहे. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे करून मतदारसंघावर पकड कायम ठेवली आहे. अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवल्यानंतरही त्यांनी राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला आहे.

संग्राम थोपटे हे ३८ वर्षाचे आहेत. ऐन तरुण वयातच त्यांना विधानसभेवर जाता आलं. त्यामुळे दिग्गज नेत्यांची भाषणं, त्यांचा अभ्यास आणि कामाची पद्धत पाहून थोपटे यांची जडणघडण झाली. पुण्यातील भोर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ. बीएपर्यंत शिक्षण घेतलेले थोपटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. भोरमध्ये गेल्या चार दशकांपासून थोपटे पितापुत्रांची सत्ता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button