पंतप्रधान मोदींची डागाळलेली प्रतिमा सावरण्यासाठी दिल्लीत ‘संघ दक्ष’ !

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या मंथनाचा आज समारोप होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोलमडलेली व्यवस्था त्यावरून मोदी सरकारच्या प्रतिमेबाबत होणारी चर्चा, पश्चिम बंगालमध्ये जोर लावूनही भाजपचा पराभव आणि नंतर तिथे उद्भवलेली राजकीय हिंसा.. पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका, योगी आदित्यनाथ यांच्या कार्यशैली बद्दल पक्षांतर्गत तक्रारी या सगळ्या बाबतीत या बैठकीत मंथन सुरू असल्याचं समजतं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून संघाचे दहा वरिष्ठ पदाधिकारी दिल्लीत चिंतन करत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व पाच सहसरकार्यवाह, भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बीएल संतोष यांच्यासह संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीत भाग घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि त्यावरून सरकारवर होणारे आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर संघाकडून सरकारसाठी प्रतिमा सुधारण्यासाठी काही सूचना होतात का हे पाहावे लागेल. या काळात झालेल्या तडजोडीतून सावरण्यासाठी संघाचा नेमका काय अजेंडा समोर येतो हे पाहावे लागेल.
शिवाय उत्तर प्रदेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाबाबत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. केंद्रातल्या सत्तेसाठी सर्वात मोठे योगदान उत्तर प्रदेशचं असतं त्यामुळे या निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संघाचे पदाधिकारी लखनौमध्ये जाऊनही तिथल्या स्थितीचा आढावा घेऊन आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं मंथन योगींसाठी काय कौल देतं हे पाहावं लागेल. उत्तर प्रदेश निवडणुकांआधी शेतकरी आंदोलनाचा प्रश्न सामोपचाराने मिटणं हे देखील सरकार साठी आवश्यक आहे, त्यादृष्टीने देखील या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.