राजकारण

समीर वानखेडे भाजप कार्यकर्ता नाही, आरोप असतील तर चौकशी करा : चंद्रकांत पाटील

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळेच वळण लागलं असून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रवादीने सखोल तपासाची मागणी केल्यानंतर आता भाजपनेही मौन सोडलं आहे. समीर वानखेडे हे भाजपचा कार्यकर्ता नाहीत, त्यांच्यावर आरोप झाले असतील तर त्याचा तपास करावा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

एनसीबीने क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीने या प्रकऱणी अटकही केली. मात्र, त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सैल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले होते. पण, १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता असा गौप्यस्फोट केल्याने या खटल्याला वेगळंच वळण लागलं आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.

समीर वानखेडे काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही. याप्रकरणी एनसीबीवर काही आरोप करण्यात आले आहेत. ज्यांनी कुणी केले आहेत, त्यांचीही चौकशी व्हावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनीही मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमून याप्रकरणाचा खोलवर तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सखोल तपासाची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button