नांदेड: मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावं माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलं आहे.
नांदेडमध्ये मराठा समाजाचा मोर्चा आज आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना संभाजी छत्रपती यांनी हे आव्हान दिलं. केंद्राने १२७ वी घटना दुरुस्ती केली आहे. राज्याला ओबीसी प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार दिल्याचं केंद्राने सांगितलं. आरक्षण देण्याचे अधिकार दिले. पण आरक्षण द्यायचं कुठून? इंद्रा सहानी केसने हात बांधले आहेत. त्याला एकच पर्याय आहे, आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही घटना दुरुस्ती केली पाहिजे. केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडावी. त्यांनी दुरुस्ती करावी. दूरवर आणि दुर्गम हा बदल करून भौगोलिक परिस्थितीचा मुद्दा टाकावा. नाही तर मग ५० टक्क्यांची कॅप बदला. तर राज्याने मराठा समाजाला मागास घोषित केलं पाहिजे. ही केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे. त्यावर बोला. वन टू वन चर्चा करायला मी तयार आहे. बोलवा सर्वांना. मराठा समाजाच्यावतीने मी बोलेन. मी वकील नाही. पण माझी भाषा वकिलासारखी आहे. केंद्र आणि राज्याचे लोकं येऊ द्या. मी समोर बसतो. होऊ द्या चर्चा, असं आव्हान संभाजी छत्रपती यांनी दिलं.
तुम्ही काय भांडता याचं आम्हाला घेणं देणं नाही. समाजाला टिकणारं आरक्षण कसं देता याच्याशी आम्हाला घेणं आहे. मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यानंतर तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यानंतर तुम्ही काय पाठपुरावा केला ते मला सांगा. काहीच पाठपुरावा केला नाही. राज्य सरकारने सांगावं मला मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे, असं आव्हानच त्यांनी दिलं.
ज्यावेळी आरक्षण रद्द झालं. त्यानंतर पुन्हा आरक्षण मिळायचं असेल तर तुम्हाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. आता राज्य सरकार म्हणतंय, कोर्टाने आरक्षण उडवलं. केंद्राने ५० टक्क्यांचा कॅप वाढवला पाहिजे. मी सुद्धा ही मागणी केलीय. पण ५० टक्क्यांचा कॅप वाढवायचा असेल तर तुम्ही सामाजिक, आर्थिक आणि दृष्ट्या मागास झाल्याशिवाय ती शिथिलता देता येत नाही. म्हणून पहिल्यांदा राज्य सरकारने मराठा समाजाला मागास घोषित केलं पाहिजे. अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही मागास घोषित करा. त्यावर आधी बोला. भोसले समितीने ज्या त्रुटी काढल्या त्या दुरुस्त करा. तुम्ही नवीन प्रवर्ग तयार करा, असं सांगतानाच आयोगात जे लोक घेतले ते बोगस आहेत. त्यांच्यावर केस आहेत. ते आम्हाला मागास काय सिद्ध करणार? असा सवाल त्यांनी केला.
त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो
खासदार संभाजीराजे यांनी आज मराठा मूक आंदोलनाला संबोधित करताना मोठा गौप्यस्फोट केला. संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारण्यात आली. महाराष्ट्रातील आपल्या खासदारांमुळे मला बोलायला संधी देण्यात आली. मात्र, ही संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांनी केला.
मला समाजाची भावना मांडायची आहे. त्यामुळे मला संसदेत बोलण्याची परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती. पण मला बोलायला परवानगी दिली नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं. आपल्याकडे समाजाची ताकद आहे. शिव-शाहूंचा वारसा आहे. हा वारसा गप्प बसणार का? शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला धुडाकवून लावलं होतं. त्यामुळे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर अरे कुठली खासदारकी सोडून टाकली, असं म्हणून मी बाहेर पडणार होतो. पण नंतर मला बोलायला संधी दिली. तेव्हा माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी सरकारला सवाल केला. ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्या पणतूला तुम्ही दोन मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा अशी सुरुवात मी केली, असं सांगतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी मला बोलता यावं म्हणून मदत केली. त्यांचे आभार मानतो, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे १५ पानी पत्र कार्यकर्त्यांनी टराटरा फाडले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काय करत आहोत, याबाबतचे पत्र संभाजीराजे छत्रपती यांना दिले आहे. १५ पानी हे पत्र आहे. पण या पत्राच्या निमित्ताने संभाजी राजे यांनी सरकारला लक्ष्य केले. हे पत्र नांदेडच्या पालकमंत्र्यांनी दिले असते तर अधिक आनंद झाला असता, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्र्यांचे पत्र फाडले. मी हे पत्र स्वीकारत नाही, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचे पत्र फाडण्याच्या प्रतिक्रियेवर मात्र त्यांनी टीका केली. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे बेशिस्त खपवली जाणार नाही. मी स्वतः कोणतेही काम बेशिस्तपणे करत नाही, अशा शब्दात त्यांनी पत्र फाडण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. मी मुख्यमंत्र्यांनी दिलेले पत्र स्वीकारत नाही. मराठा समाजासाठी काय करतोय हे त्यांनी लिहिलय. पण पत्रामध्ये अनेक तफावती असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच मी या पत्राचा स्वीकारत नसल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायचे होते, तर ते पालकमंत्र्यांच्या हस्ते द्यायचे होते, असेही त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाणांच्या गैरहजेरीवरुन हल्लाबोल
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, त्यावेळी त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, असा घणाघात संभाजीराजेंनी केला. अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांवर कडाडून टीका केली.
प्रकाश आंबेडकरांचं कौतुक
प्रकाश आंबेडकर आमच्या आंदोलनात आले, त्यांचं कौतुक …! गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही तुमची भूमिका. देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ. हेच या सरकारने सांगितले त्यामुळे शोषित वंचितांना आरक्षण मिळालेच पाहिजे , असं संभाजीराजे म्हणाले.