Top Newsराजकारण

उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक; ‘सारथी’बाबत महत्त्वाचे निर्णय

पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येईल. पहिलं उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शैक्षणिकदृष्टया महत्वाच्या शहरात सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात. सारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम व काही उपक्रम शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत, त्यांना मान्यता घेवून उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे.

तारादूत प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेने दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेवून आर्थिकदृष्टया गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

बैठक समाधानकारक, १२ महत्वाच्या मागण्या मान्य : संभाजीराजे

सारथी संस्थेसंदर्भात समाधानकारक चर्चा झाली असून सरकारने आपल्या महत्वाच्या १२ मागण्या मान्य केल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठा समाजाच्या मूक आंदोलनाची दखल घेऊन आज सारथी संस्थेविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सारथीसंबंधी प्रमुख बारा मागण्यांपैकी बहूतांश मागण्या पूर्णतः मान्य करून घेण्यात आल्या आहेत. सारथी संस्थेला पूर्णतः स्वायत्तता असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पुनश्चः स्पष्ट केल्याचे संभाजीराजेंनी सांगितलं. राज्यात सारथीची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली असून कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत निर्देश दिले.

प्रमुख शैक्षणिक शहरांच्या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून वसतीगृह उभारणी, सारथीमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा, प्रशिक्षण, संशोधन यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची मागणी आपण मान्य करून घेतली.

सारथी लाभार्थीसाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख असून त्यात १ लाखाच्या आत, ३ लाखाच्या आत, ३ ते ५ लाखाच्या आत व ५ ते ८ लाखाच्या आत असे टप्पे तयार करून अभ्यासक्रमनिहाय सारथीकडून देण्यात येणारे विद्यावेतनाची टक्केवारी ठरविण्यात येईल, जेणेकरून जास्तीतजास्त गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळू शकेल, यादृष्टीने निर्णय घेण्यात आला. सारथी प्रशासनासाठी आवश्यक असणारी पदे तात्काळ भरण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. तसेच, तारादूत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. याचबरोबर, सारथीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाची छपाई करून त्याचे तात्काळ वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आपण मागणी केलेल्या १००० कोटी रूपयांच्या निधीबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन २० दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button