सदाभाऊ खोतांनाही राज ठाकरेंचा पुळका; म्हणाले, तेच शेतकऱ्यांना न्याय देतील !

नाशिक : भाजप नेत्यांप्रमाणेच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनाही आता राज ठाकरेंचा पुळका आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील असा विश्वास यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. अमित ठाकरे आणि सदाभाऊ खोत दोघेही सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आणि सदाभाऊ खोत यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा आहे.
कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली. एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. अनेक जण असल्याने तीन ठिकाणं बैठकी आहेत. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राजसाहेब सगळीकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून शाखा अध्यक्ष महत्त्वाचा आहे. यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद नाही. शाखाध्यक्ष महत्वाचा आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय, असं अमित ठाकरे म्हणाले.




