इतर

सचिन वाझे यांना अखेर अटक, ‘मॅरेथॉन’ चौकशीनंतर ‘एनआयए’ची कारवाई

मुंबईः मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या ‘मॅरेथॉन’ चौकशीनंतर मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे Sachin Vaze) यांना राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) कडून अटक करण्यात आलीय. शनिवार (13 मार्च) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली. वाझे यांना रविवारी सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेत. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जात आहे. सचिन वाझेंवर स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी देखील आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलंय. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करतेय. एनआयएने सचिन वाझेंवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यावर अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला.

विशेष म्हणजे एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze ) यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) फेटाळला होता. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर एनआयएनं त्यांना अटक केलीय. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. या प्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला.

जामीन फेटाळताना कोर्टाने स्पष्ट म्हटले होते की, “त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे.” सचिन वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला होता. विशेष म्हणजे NIA च्या आधीच 12 तारखेला महाराष्ट्र एटीएसनंही सचिन वाझे यांची चौकशी केली होती. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली होती. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही. मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती वाझेंनी एटीएसला दिली होती. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button