सचिन वाझेला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे (Sachin Vaze) यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने वाझे यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सचिन वाझेने नुकतेच एक पत्र लिहून शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि अन्य नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. हे पत्र सचिन वाझेने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिल्याची चर्चा होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘एनआयए’कडून कोर्टात वेगळाच दावा करण्यात आला. सचिन वाझेचे हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले, असा सवाल विचारत ‘एनआयए’ने आक्षेप नोंदवला. सचिन वाझे हे आमच्या कस्टडीत होते. इतर तपास यंत्रणांना या पत्राची माहिती नव्हती. मग तरीदेखील हे पत्र मीडियात कसे लीक झाले, असा सवाल ‘एनआयए’च्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर न्यायाधीशांनी सचिन वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले. त्यावर असा प्रकार पुन्हा होता कामा नये, अशी ताकीद न्यायाधीशांनी दिल्याचे समजते.
सचिन वाझेची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी आपल्याला सुरक्षित सेल मिळावी, अशी मागणी केल्याचे समजते. तसेच सचिन वाझेची प्रकृती आता ठीक असून त्यांना इतक्यात कोणत्याही उपचारांची गरज नसल्याचे ‘एनआयए’ने स्पष्ट केले.
‘एनआयए’ सीबीआयला सचिन वाझेची डायरी देणार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. यामध्ये सचिन वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटसचा तपशील आहे. ही डायरी तपासासाठी आपल्याला मिळावी, अशी मागणी सीबीआयने ‘एनआयए’ कोर्टात केली होती. विशेष कोर्टाने ही मागणी मान्य केली आहे.