सचिन पायलट ६ दिवस दिल्लीत थांबूनही राहुल-प्रियंका गांधी यांची भेट नाही !
नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेसमध्ये चिंतन आणि मंथन सुरू आहे. सध्या, सचिन पायलट मौन बाळगून आहेत. मात्र, त्यांच्या मौन असण्यामागचे कारण त्यांची नाराजी आहे आणि नाराजीमागे ती आश्वासनं आहेत जी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर सचिन पायलट हे दिल्ली दरबारी गेले होते. ६ दिवस त्यांनी दिल्लीत मुक्काम केला, मात्र पक्षश्रेष्ठीच्या भेटीशिवाय त्यांना परत फिरावे लागले आहे.
काँग्रेस हायकमानकडून सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रात्री उशिरा सचिन पायलट यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त होते. मात्र, दुसरीकडे सचिन पायलट दिल्लीत जाऊन आले, पण त्यांना काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी भेट दिली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसच सरकार काम करेल, असा संदेशही सचिन यांना देण्यात आला आहे. सचिन हे भविष्यातील मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना भविष्यात मोठी संधी असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत सचिन पायलट यांचे मतभेद झाले होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर पायलट यांनी माघार घेतली होती. यावेळी सरकारमध्ये सचिन पायलट यांची भागीदारी वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पायलट गटातील आमदारांना मंत्री अथवा राज्यातील कुण्या बोर्डाचे सदस्यत्व अथवा चेअरमन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी, पक्षातील कलह संपवण्यासाठी, अशा प्रकारे मार्ग काढण्यात आला असला तरी वाद अद्यापही संपलेला नाही.