मुंबई : शिवसेना उपनेते सचिन अहिर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांच्याकडे शिवसेनेने महत्त्वाची जबाबदारी दिलीय. स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्तींचे आदेश दिलेत. यानुसार सचिन अहिर यांची पुणे संपर्कप्रमुख पदावर आणि आदित्य शिरोडकरांची पुणे सहसंपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलीय.
मनसेत दीर्घ काळ कामाचा अनुभव असलेल्या आदित्य शिरोडकर यांना ऐन पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पुण्यात जबाबादारी दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून पुण्यावर भर दिलाय. त्यांच्या पुणे प्लॅनला चेकमेट करण्यासाठीच शिवसेनेने आदित्य शिरोडकरांना पुण्याची जबाबदारी दिल्याचंही बोललं जातंय.
विशेष म्हणजे तरुण आदित्य शिरोडकरांना राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या सचिन अहिर यांची साथ मिळणार आहे. त्यामुळे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर या नियुक्तीनंतर पुण्यात नेमकी कोणती रणनीती आखताय हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.