पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशहून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी सक्तीची!
मुंबई : महाराष्ट्रातही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. यामुळे इतर ठिकाणाहून राज्यात होणारा कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना संवेदनशील आपत्तीचे ठिकाण घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना ‘आरटी-पीसीआर’ ही चाचणी करणे सक्तीचे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
याबाबतचा आदेश महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जाहीर केला आहे. या आदेशात म्हटले की, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल हे कोरोना उत्पत्तीची संवेदनशील राज्ये आहेत. त्यामुळे या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना आता ‘आरटी-पीसीआर’ चाचणी निगेटीव्ह असल्याचे जाहीर करणे बंधनकारक असणार आहे. इतर राज्यांतून महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये कोरोना उत्पत्तीची संवेदनशील जागा असल्याचे राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार आता पुढील आदेश येईपर्यंत ही दोन्ही राज्ये उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे मानली जाणार आहेत. तसेच या ठिकाणांहून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेली एसओपी लागू असणार आहे. त्यांना प्रवेशापूर्वी ४८ तास आधीचा निगेटिव्ह ‘आरटी-पीसीआर’ रिपोर्ट दाखवूनच राज्यांत प्रवेश मिळणार आहे.
काही दिवसांआधी महाराष्ट्राने राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, केरळ, उत्तराखंड या राज्यांना उत्पत्तीची संवेदनशील राज्ये म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आता उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही उत्पत्तीची संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसर आहे. त्यामुळे या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग अधिक वाढू नये यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.