नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आल्याच्या टीकेची गंभीर दखल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांनी विचारमंथन सुरु केल्याचे सांगितले जाते. यासाठी नुकतीच दिल्लीत संघ आणि भाजपच्या नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीला संघाचे नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेते उपस्थित असल्याचे समजते.उत्तर प्रदेशात गंगेत शेकडो मृतदेह तरंगताना आढळल्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारची प्रतिमा मलीन झाली होती. तर राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारलाही कोरोना हाताळणीतील अपयशावरुन प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. यामुळे सरकार आणि पर्यायाने भाजपची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीरपणे पावले उचलायला सुरुवात केल्याचे समजते. संघ आणि भाजप नेत्यांच्या विचारमंथनात पश्चिम बंगालमधील पराभवाची कारणंही शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी नुकतीच दिल्लीत संघ आणि भाजप नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याचे समजते. संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी मात्र अशी बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.