मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ करणार : अनिल देशमुख

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ‘एटीएस’कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ‘एटीएस’कडे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आरोप केल्यानंतर तुम्ही कुणाला वाचवत आहात? असा सवाल फडणवीस यांनी करताच अर्णव गोस्वामींना आत टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग आहे का?, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले.
मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कुणाला वाचवत आहात?, असा सवाल गृहमंत्र्यांना विचारला. तसंच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली. हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी आत्महत्या करत नाहीत. तसेच क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्वात आधी गोस्वामी पोहोचले कसे? वाझे यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास कस? असा सवाल फडणवीस यांनी केला.
कोण सचिन वाझे? काळा की गोरा आम्हाला माहीत नाही. त्याने काय केलं किती एन्काऊंटर केले त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सांगत याप्रकरणाचे माझ्याकडे पुरावे आहेत. सीडीआर आहे. स्टेटमेंट आहे. मी हवेत बोलत नाही. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचे आरोप गंभीरपणे घेतले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
आशिष शेलार काय म्हणाले…?
तुम्ही त्या वाझेला आमच्या अंगावर टाकू नका. तो वाझे बिझे गेला वाजत. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. जर काळं बेरं नाही तर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे का देत नाही? तुम्ही स्वत: या प्रकरणात म्हटलं पाहिजे की हे प्रकरण आम्ही एनआयकडे देतो म्हणून, असा आक्रमक पवित्रा शेलार यांनी घेतला. गृहमंत्र्यांच्या उत्तरात विसंगती आहे. वाझेचं नाव आलं की मुंबई पोलिसांचं नाव गृहमंत्र्यांनी जोडलं, असा आरोप शेलार यांनी केला.
मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे आणि मुंबई पोलीस सक्षम आहे. एएनआयकडे तपास देण्याची गरजच नाही, असं सांगताना अर्णवला आतमध्ये टाकलं म्हणून तुमचा त्याच्यावर राग आहे का?, असा सवाल त्यांनी विरोधी पक्षाला केला.