आरएसएस नेहमीच धर्मांतराच्या विरोधात : दत्तात्रय होसबाळे
धारवाड: धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे, असेच आरएसएसचे कायमच मत राहिलेले आहे. कोणी स्वेच्छेने निर्णय घेत असेल तर गोष्ट वेगळी, पण तसे होत नाही. मग धर्मांतर करणारे दुहेरी लाभ कसे घेऊ शकतात, अशी विचारणा करत आतापर्यंत १० हून अधिक राज्यांच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी विधेयके आणले आहेत. ही सर्व सरकारे भाजपची नाहीत. हिमाचल प्रदेशामध्ये वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने हे विधेयक फार पूर्वी मंजूर केले. अरुणाचल प्रदेश काँग्रेसने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केले. धारवाड येथे रा. स्व. संघाच्या आयोजित अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत एकत्रितरित्या काम करतील, तसेच विविध उपक्रमांचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अनाम क्रांतिकारकांचे जीवन समाजासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. अशी माहिती दत्तात्रेय होसबाळे यांनी दिली.
काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल समाज अनभिज्ञ आहे. अशा क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. भारतातील स्वातंत्र्य चळवळ जगात वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. स्वातंत्र्य आंदोलन सर्वाधिक काळ चालले. स्वातंत्र्य आंदोलनात देशाची एकात्मता ठळकपणे दिसून आली. ही स्वातंत्र्य चळवळ केवळ इंग्रजांविरोधात नव्हती, तर ती भारताचे ‘स्व’ जागृत करणारी चळवळ होती. याकरिता यामध्ये स्वदेशी, स्व-भाषा, स्व-संस्कृतीचा समावेश झाला. त्यामुळे भारताच्या स्व चा अर्थ इंग्रजांना येथून केवळ हाकलणे, एवढेच नव्हते. तर भारताचा आत्मा जागृत करण्याचे होते, याकरिता स्वामी विवेकानंदांसहित अनेक महान पुरुषांनी मोलाची कामगिरी बजावली. याचबरोबर याप्रसंगी सध्याच्या पिढीने भारताला प्रत्येक क्षेत्रात जगात उत्कृष्ट बनविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा मनाशी संकल्प करायला हवा, असेही होसबाळे यांनी सांगितले.
आरएसएस पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. मात्र, केवळ दिवाळीतच फटाक्यांवर बंदी घालणे हा प्रश्नावर उपाय नाही. इतर देशांमध्येही सणाच्या वेळी फटाके वाजवले जातात. अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रीय दिनी न्यूयॉर्कमध्ये फटाके फोडले जातात. फटाक्यांवर पूर्ण बंदी घातल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत आणि लोकांचा आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे फटाके बंदीचा निर्णय संबंधित मंत्रालय आणि पर्यावरणतज्ज्ञांशी चर्चा करूनच घ्यावा, असे होसबाळे यांनी नमूद केले.