राजद नेत्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेट तालिबानसोबत तुलना
आरएसएस भारतातील तालिबान; बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना करतात मारहाण !
नवी दिल्ली : बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) टीकास्त्र सोडलं आहे. राजद नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना थेट तालिबानसोबत केली आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान जे काम करत आहे तेच काम भारतात आरएसएस करत असल्याची बोचरी टीका जगदानंद सिंह यांनी केली आहे. पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणात जगदानंद यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून राजकारण तापलं असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आरएसएस भारतातील तालिबान; बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात, असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तालिबान आणि आरएसएसमधील फरक याबद्दल बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. पाटणामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना जगदानंद सिंह यांनी, तालिबान हे नाव नसून एक संस्कृती आहे जी अफगाणिस्तानमध्ये आहे. आरएसएस हे भारतामधील तालिबानी आहेत. दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. संघाचे लोक बांगड्या विकाणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात. आपल्याला या लोकांना थांबवायला हवं. त्यांच्याविरोधात आपण पुढे येणं गरजेचं आहे, म्हटलं आहे.
राष्ट्रीय जनता दलाने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून आपल्या नेत्याच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलं आहे. जगदानंद सिंह यांच्या या विधानावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपाने यावर पलटवार केला आहे. जो ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याप्रमाणे विचार करतो अशा शब्दांत सणसणीत टोला लगावला आहे. तसेच भाजपाचे प्रवक्ते अरविंद सिंह यांनी देखील आरजेडी ज्या संस्कृतीचा पक्ष आहे त्यानुसार ते विधान करणार. जगदानंद सिंह हे अशाप्रकारचं विधान करतील असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांचे गुण आत्मसात करतो असं म्हणत टोला आता लगावला आहे.