आरोग्यफोकस

दुसऱ्या टप्प्यातील मुंबईत तिसऱ्या टप्प्यातीलच निर्बंध कायम !

सर्वसामान्यांसाठी तूर्त लोकल सेवा नाहीच !

मुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्क्यांच्या खाली असल्याने मुंबई निर्बंधांचा तिसर्‍या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यांत आली आहे. मात्र पालिका प्रशासनाने सबुरी ठेवत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होण्याची चिन्हे नाहीत.

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी दर अधिक असल्याने मुंबईचा समावेश तिसर्‍या टप्प्यात करण्यात आला होता. यामुळे दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली होती. मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर आणखी कमी होऊन आता ४.४० टक्के एवढी आहे. तर ऑक्सिजन खाटांचे प्रमाण २७.१२ टक्के एवढे आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे.

मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करताना निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेकडे सोपविण्यात आले होते. मात्र मुंबईची भौगोलिक रचना व लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, लोकल ट्रेनमधून दाटीवाटीने प्रवास करणारे लाखो प्रवासी, तसेच हवामान खात्याने येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पालिका प्रशासनाने सध्या सुरू असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा नाहीच !

बाधित रुग्णांचे प्रमाण मुंबईत दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबई दुसर्‍या टप्प्यात असली तरी ठाणे, नवी मुंबई अद्यापही तिसर्‍या टप्प्यात आहे. त्यामुळे तिथून येणार्‍या प्रवाशांकडून संसर्गाचा धोका असल्याने सध्या तरी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी मिळणे शक्य नाही. कोरोनाबाधित रुग्णसंख्येवर नजर असणार असून पुढील १५ दिवस रुग्ण संख्येचा सतत आढावा घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button