भारतीय जनता पक्षात आता निष्ठावंतांपेक्षा आयारामांचा जादा सन्मान केला जात आहे, हे अलीकडच्या तीन घटनांनी दाखवून दिले आहे. आसाममध्ये काँग्रेसमधून आलेल्या हिमंत सरमा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. पश्चिम बंगालच्या विरोधी पक्षनेतेपदी तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या सुवेंदू अधिकारी यांना बसविण्यात आले, तर आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बस्वराज बोम्मई यांना पदोन्नती देण्यात आली. पक्षापेक्षा मोठे होणा-या नेत्यांना काही ना काही कारणामुळे मार्गदर्शक मंडळात पाठविण्याची व्यवस्था भाजपने केली आहे. त्यात आता कर्नाटकात भाजपचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या बी. एस. येदियुरप्पा यांचाही समावेश आहे. येदियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री नको, सत्ता आणि संघटनेचा समतोल साधण्यासाठी अन्य समाजाचा मुख्यमंत्री करा, असे भाजपला सांगितले होते; परंतु लिंगायत समाजाला डावलले, की काय होते, हे भाजपने एकदा अनुभवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही लिंगायत समाजाचाच मुख्यमंत्री असावा, असा आग्रह होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघात चांगला समन्वय असल्याने संघाचा सल्ला डावलला जडाण्याीच शक्यताच नव्हती; परंतु तरीही ब्राम्हण मुख्यमंत्री करण्याची चर्चा सुरू झाली होती. प्रल्हाद जोशी यांचे नाव पुढे आले होते. बी. एल. संतोष यांना केंद्रातून कर्नाटकात पाठविले जाईल, असाही होरा होता; परंतु उत्तराखंडमध्ये केंद्रातून राज्यात पाठविलेल्यानेत्याचे काय होते, हा ताजा अनुभव भाजपच्या पाठिशी असल्याने संतोष यांच्या नावाचा विचार केला गेला नसावा. त्यातच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार असल्याने सामाजिक असंतोषाचा फटका बसणार नाही, हा विचार बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यामागे आहे. येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगितल्याने तेथील लिंगायत धर्मगुरूंनी व्यक्त केलेली जाहीर नाराजी भाजपला परवडणारी नव्हती. कर्नाटकात लिगायत आणि वोक्कलिंग हे दोन प्रमुख समाजअसले, तरी त्यातील वोक्कलिंग समाज धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या, तर लिंगायत समाज भाजपचा पाठीराखा असल्याने लिंगायत समाजाला मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने विधानसभा निवडणुकीची काळजी घेतली आहे. शिवाय येदियुरप्पा यांनी राजीनामा देताना ज्या तीन अटी घातल्या होत्या, त्यातील एका अटीची पूर्तता केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री निवड करताना पूर्तता केली आहे. बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविताना ते येदियुरप्पा यांच्याच समाजाचे आणि त्यांचे विश्वासू सहकारी आहेत, हे निकष लावण्यात आले. येदियुरप्पा यांच्याविषयी भाजपच्या काही आमदारांची नाराजी होती, तरीही त्यांच्याइतका प्रभावी नेता पक्षाकडे नसल्याने त्यांना दुखावून भाजपला चालणार नव्हतेच.
लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री नको, असे सांगणा-या येदियुरप्पा यांनीच लिंगायत असलेल्या बोम्मई यांचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचवले आणि त्यावर कर्नाटकात शिक्कामोर्तब करण्यात आले. बोम्मई हे आधी जलसंपदा मंत्री आणि नंतर गृहमंत्री होते. आता ते थेट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बस्वराज हे कर्नाटकचेच माजी मुख्यमंत्री एस.आर.बोम्मई यांचे पुत्र आहेत. पिता-पुत्र मुख्यमंत्री होण्याचा योग कर्नाटकातही जुळून आला. आधी वडील आणि नंतर मुलगाही मुख्यमंत्री होण्याची कर्नाटकातील ही दुसरी वेळ आहे. त्यांच्या आधी एच.डी.देवेगौडा आणि एच.डी.कुमारस्वामी हे दोघे वडील-मुलगा मुख्यमंत्रिपदी राहिले आहेत. बस्वराज हे भाजपत वेगाने वर गेलेल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्याची राजकीय कारकीर्द धर्मनिरपेक्ष जनता दलातून सुरू झाली. धर्मनिरपेक्ष जनता दलातून बाहेर पडलेल्या नेत्याला अन्य पक्ष मुख्यमंत्री करतात, हे दोनदा घडले. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी तिथे आयारामांना संधी दिली. काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष जनता दलातून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले होते. त्यांच्याच काळात काँग्रेसची सत्ता गेली आणि नंतर धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसे आघाडी सरकार जाण्यातही त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. बोम्मई हावेरी जिल्ह्यातल्या शिगगाव विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. धर्मनिरपेक्ष जनता दलात निराश झालेल्या बोम्मई यांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. पक्षप्रवेशासंबंधी काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांकडून काहीतरी निरोप मिळेल, या आशेवर त्यांनी जवळपास आठवडाभर वाट पाहिली होती. तिथे काही हाती न लागल्यानंतर ते येदियुरप्पा यांना भेटायला गेले. तिथे वेटिंग रुममध्ये थांबून ते येदियुरप्पांची वाट पाहायचे. “मी काहीच बोलायचो नाही. तिथे शांतपणे बसून राहायचो. एक दिवस एक व्यक्ती येदियुरप्पांना तिकिटासाठी हैराण करीत होती, तेव्हा त्यांनी माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं- त्यांना पाहा…किती संयम ठेवून वाट बघताहेत,”असे बोम्मई यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. येदियुरप्पा यांच्या निकटवर्यीयांत समावेश असला, तरी बोम्मई यांना सर्वांना सांभाळून घेऊन राज्य कारभार करावा लागेल. त्याचे कारण उत्तराखंडमध्ये तीरथसिंह रावत यांना अवघ्या चार महिन्यांत भाजपच्या नाराज आमदारांनी पायउतार होण्यास भाग पाडले, हा इतिहास आहे. येदियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आमदार खरेदीप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचे आरोपही त्यांच्याविरोधात झाले. ईश्वराप्पा, विश्वनाथ यांच्यासारखे नेत्यांनी येदियुरप्पा यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. त्यांच्यासह अन्य नेत्यांना आता मंत्रिमंडळात स्थान दिले जाते का, तसेच दोन उपमुख्यमंत्री करण्याचा उत्तर प्रदेश फाॅर्म्युला राबवून तिथे वोक्कलिंग समाजाला प्रतिनिधित्व दिले जाते का, हे लवकरच स्पष्ट होईल; परंतु कर्नाटकसारख्या राजकीयदृष्ट्या अस्थिर आणि संवेदनशील राज्याचे नेतृत्व करणे ही तारेवरची कसरत आहे,ती बोम्मई कशी करतात, यावर कर्नाटकात पुढचे सरकार भाजपचे येईल, की नाही, ते ठरणार आहे.