मालेगाव/अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटले आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलं आहे. जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि काही भागात जाळपोळ करण्यात आलीय. नांदेडमध्ये दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक भागात दगडफेक केली. त्यात अनेक वाहनं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्रिपुरा इथे घडलेल्या कथित घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. तसंच निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जमावाकडून शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अचानक दगडफेक सुरु करण्यात आली. या दगडफेकीत अनेक चारचाकी गाड्या, दुचाकीचं नुकसान करण्यात आलं. तसंच परिसरातील दुकानांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दुकानातील काचा फोडून वस्तूंचं मोठं नुकसान करण्यात आलं.
मालेगावात तणाव; मुस्लिम समाज आक्रमक
त्रिपुरा राज्यात आयोजित एका रॅलीमध्ये पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुस्लिम समाज आक्रमक झाला असून रॅली मार्फत याचा निषेध नोंदवण्यात येत होता. नाशिकमधील मालेगावातही मुस्लिम संघटनांनी बंद पुकरला होता. या बंदला सायंकाळी गालबोट लागले. आंदोलकांकडून रॅली दरम्यान दगडफेक करण्यात आली.
त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ आज मालेगावातील काही मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला मालेगावसह मनमाडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला. दुपारपर्यंत सर्व बंद सुरळीत सुरु होता. बंद शांततेत पार पाडत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी केली. मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली होती. या दुकानदारांवर दबाव टाकून बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या आणि मोर्चा काढण्याच्या उद्देशाने काही लोक नवीन बस स्थानक परिसरात एकत्र गोळा झाले होते. मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवले आणि माघारी पाठवले. यामुळे जमावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही जमावावर सौम्य लाठी चार्ज केला.
दगडफेकीच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी अश्रू धुराच्या कांड्याचा वापर करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली असून यात काही नागरिक व पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
छगन भुजबळांचे शांतता राखण्याचे आवाहन
मालेगावातील दगडफेकीच्या घटनेवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही काहीही बरळतील. कोरोनानंतर आता कुठे आनंदी वातावरण आहे. कृपया डोके गरम करून घेऊ नका, शांतता राखा. पोलीस त्यांचे काम करतील. आपल्या कृतीमुळे कुठल्याही संकटात वाढ होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलकांना केले आहे.
अमरावतीत मोर्चाला हिंसक वळण, २ पोलीस जखमी
त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या १५ ते २० हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील २० ते २२ दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.
मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले
राज्य सरकारने दखल घ्यावी: देवेंद्र फडणवीस
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.
राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. असं म्हटलंय. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दुसऱ्या राज्यातील घटनेवर मालेगावात प्रतिक्रिया उमटण्याचे कारण नाही : चंद्रकांत पाटील
मालेगावातील तणाव परिस्थिती चिघळू नये. त्रिपुरातील पडसाद इथे कसे उमटू शकतात? असा सवाल करीत दुसऱ्या राज्यातील घटनेवर मालेगावात प्रतिक्रिया उमटण्याचे कारण नाही, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून असे घडत आलं आहे जगात कुठे काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया देशात उमटते. त्रिपुरामध्ये मशीद का पाडली? ते अनधिकृत बांधकाम होत की नाही माहीत नाही. परंतु तिथल्या घटनेचे मालेगावात पडसाद उमटण्याचे कारण नाही. तिथे पोलिसांनी बळाचा वापर करू नये कारण तसे केले तर महविकास आघाडीच्या वोट बँकला धक्का बसेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.