सामाजिक सलोखा बिघडवण्याचा वारंवार प्रयत्न; शांतता राखण्याचे नवाब मालिकांचे आवाहन
मुंबई: महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या राज्यात शांतता कशी राहिल यावर भर द्या, असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रचंड हिंसाचार झाला. भाजपने आज अमरावती बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदलाही हिंसक वळण लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे.
ज्या ठिकाणी हिंसा झाली आहे त्या हिंसेचा आम्ही निषेध करतो. आम्ही लोकांना आवाहन करतो की, आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे पण आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता ठेवायला हवी. (२/२) pic.twitter.com/U71WIFTgdV
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 13, 2021
शुक्रवारप्रमाणे आजही, शनिवारी दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये त्रिपुरातील घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शेकडो तरुण अमरावतीच्या रस्त्यावर उतरले आहेत. याच अनुषंगाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान मलिकांनी लोकांना शांतता राखवी, असं आवाहन केलं. तसंच वसीम रिझवीच्या माध्यमातून देशात वातावरण बिघडवण्याचं काम सुरू असून दोषींवर सरकारकडून कठोर कारवाई होईल, असं त्यांनी सांगितलं.
नवाब मलिक म्हणाले की, ‘त्रिपुरा येथे हिंसा झाली. त्याचबरोबर वसीम रिझवीने जे पुस्तक लिहिले आहे त्याच्याविरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता. यादरम्यान नांदेड, अमरावतीमध्ये हिंसा झाली आहे. या हिंसेचा आम्ही कठोर शब्दात निंदा करतो. ज्या कुठल्याही संघटना असं लोकांना आवाहन करतायत. त्यांची जबाबदारी असते की, आंदोलन करणं किंवा निषेध दर्शवणं हे लोकांच्या अधिकार आहे. पण आवाहन करणे आणि त्याच्यावर नियंत्रण नसणं हे योग्य नाही. जे कोणी आंदोलन पुकारत आहेत, त्यांनी नियोजित पद्धतीनं आंदोलन पुकारली पाहिजे. त्याच्यातून हिंसा होणार नाही, याची दक्षता घेणं लोकांची जबाबदारी आहे. जे काल घडलं आहे, ते योग्य नाही. जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई होणारच आहे. लोकांनी शांतता ठेवली पाहिजे.’
पुढे मलिक म्हणाले की, ‘ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने वसीम रिझवी गेल्या दोन-चार वर्षांपासून या देशामध्ये देशातला सलोखा कसा बिघडले? याबाबतीत वारंवार विधान करतायत, काही पुस्तकं लिहतायत. लोकांची भावना दुखावण्याचे काम करतायत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. म्हणजेच नियोजितपणे देशाचे वातावरण कशा पद्धतीने बिघडले हे वसीम रिझवीच्या माध्यमातून सुरू आहे. वसीम रिझवी शिया वक्फ बोर्डचे चेअरमन होते. त्यांनी तिकडे अफरातफरी केली. २०१६-१७ साली उत्तर प्रदेश पोलिसांत तक्रार झाल्यानंतर शिया समाजातील सगळ्या धार्मिक गुरुंनी मोदींकडे आणि राजनाथ सिंह यांच्याकडे लखनऊचे खासदार असताना तक्रार केल्यानंतर हे सर्व प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. पण अजून सीबीआय प्रकरणात कोणतीही कारवाई करत नाही. कोल्ड स्टोरेजमध्ये हे प्रकरण ठेवण्यात आले आहे आणि या वसीम रिझवीला कुठेतरी मोकळी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील वातावरण बिघडतय. तात्काळ वसीम रिझवीवर कारवाई करण्याची आम्ही मागणी करतोय. भविष्यात कुठलेही विधान किंवा लिखाण करणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.’
‘लोकांनी आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे. आंदोलनाला हिंसक वळणं लागत असेल तर हे योग्य नाही. लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. जे कोणी या हिंसेला जबाबदार आहेत, त्यांच्यावर सरकारच्या वतीने निश्चित रुपाने कारवाई होईल. जिथे हिंसा झाली असेल तेथे लोकांनी शांतता ठेवली पाहिजेत. यापुढे अशी हिंसा होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शांत वातावरण राज्यात ठेवायचे आहे. शांतत भंग करण्याचे काम बरेच लोकं करत आहेत, त्याला बळी न पडता शांतता ठेवली पाहिजे,’ असे मलिक म्हणाले.