रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही कोरोनावरील लस येणार
नवी दिल्ली : रिलायन्स लाईफ सायन्सेसला दोन डोसच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीला पहिल्या टप्प्यातील चिकित्सालयीन चाचणी करण्यास मंजुरी देण्याची शिफारस विषय तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे. आता रिलायन्स लाईफ सायन्सेसला पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यासाठी भारतीय औषधी महानियंत्रकाची (डीसीजीआय) मंजुरी घ्यावी लागेल.
डीसीजीआयची मंजुरी मिळाल्यानंतर रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनी पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु शकते.विषय तज्ज्ञ समितीने रिलायन्स लाईफ सायन्सेसचा अर्ज मंजुर करुन पहिल्या टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्याची शिफारस बैठकीत केली.ही लस रिकॉम्बिनन्ट प्रोटीन आधारित (जनुकीय, पेशी पुन:संयोग ) आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसची स्वत:चे कोविड-१९ चाचणी केंद्र आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह दहा ठिकाणी लसीची पहिली चाचणी केली जाईल. चाचणीचा पहिला टप्पा दोन महिने किंवा ५८ दिवसांचा असतो. लसीची सुरक्षा, क्षमता आणि प्रभाव याची माहिती घेणे, हा चाचणीमागचा उद्देश असतो.
रिलायन्स लाईफ सायन्सेस ही कंपनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील एक कंपनी आहे. बायो-थेराप्युटिक्स, फार्मास्युटिकल्स, क्लिनिकल रिसर्च, मॉल्यूकलर मेडीसिन आदी क्षेत्रात व्यावसायिक संधी विकसित करणारी रिलायन्स लाईफ सायन्सेस संशोधन संचालित कंपनी आहे. कंपनीच्या नवीन मुंबईतील केंद्रात ही लस विकसित केली जात आहे.
सहा लसींना मंजुरी
डीसीजीआयने आतापर्यंत आपात्कालिन वापरासाठी सहा लशींना मंजुरी दिली. यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, रशियाची स्पुतनिक-व्ही आणि मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायकोव्ह-डी या अमेरिकन कंपन्यांच्या लशींचा समावेश आहे.