एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा विक्रमी वाढ, दुसरीकडे लसीचा तुटवडा
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत असून सोमवारी ४७ हजारांपर्यंत घसरलेल्या रुग्णसंख्येने मंगळवारी पुन्हा उच्चांक गाठला. मंगळवारी राज्यामध्ये ५५ हजार ४६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख १३ हजार ३५४ झाली असून ४ लाख ७२ हजार २८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राज्यामध्ये मागील २४ तासांमध्ये २९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांची संख्या ५६ हजार ३३० वर पोहोचली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे. दुसरीकडे मुंबईत केवळ १ लाख ८५ हजार लसींचा साठा शिल्लक असून हा साठा पुढील ३ दिवस पुरेल इतकाच आहे, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
मंगळवारी २९७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९८ टक्के इतके आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३,३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ५५ हजार ४९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईमध्ये १० हजारहून अधिक नवे रुग्ण
मुंबईमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी मुंबईमध्ये १० हजार ३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात ४ लाख ७२५ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर मुंबईत ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मुंबईत लसीचा तुटवडा
मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीचे डोस देण्यास सुरुवात केली. कालपर्यंत १४ लाख ११ हजार ३२८ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र आता मुंबईत केवळ १ लाख ८५ हजार लसींचा साठा शिल्लक असून हा साठा पुढील ३ दिवस पुरेल इतकाच आहे, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुंबईला पुढील तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक असल्याची कबुली दिली आहे. तसेच, आम्ही केंद्र सरकारकडे लसीचा अधिक पुरवठा करण्याबाबत अगोदरच मागणी केली असल्याचे व त्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईला पुढील लसीचा साठा १५ एप्रिलपर्यंत उपल्बध होणार आहे. तोपर्यंत मुंबईत लसीचा तुटवडा निर्माण होणार आहे.लसींच्या तुटवड्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, केंद्राने आतापर्यंत लसीचा साठा पुरवूनही महापौर उगाच केंद्राला दोष देऊन राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता लसीच्या तुटवड्यावरून मुंबईत शिवसेना व भाजप यांच्यात घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे लस कधी मिळणार याकडे मुंबईकर डोळे लावून बसले आहेत.