Top Newsराजकारण

फडणवीसांनी काढलेल्या ‘राणे कुंडली’चे विनायक राऊतांकडून वाचन

अंकुश राणेंची हत्या कोणी केली?... फडणवीस आणखी काय काय म्हणाले होते?

नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये ३९ वर्षे काम केल्यानं अनेक जुनी प्रकरणं माहीत आहेत. हळूहळू टप्प्याटप्प्यानं प्रकरणं बाहेर काढू, असा गर्भित इशारा देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे आणि त्यांच्या पुत्रांच्या जुन्या प्रकरणांची यादी वाचून दाखवत ‘राणे कुंडली’चा उल्लेख केला. ही कुंडली विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनीच वाचून दाखवली होती, हे सांगायलादेखील राऊत विसरले नाहीत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विधिमंडळात राणे कुंडलीचा उल्लेख केला होता. त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते. राणेंवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली होती. फडणवीसांनी मांडलेल्या त्या राणे कुंडलीचा अभ्यास राज्य सरकारनं जरूर करायला हवा, असं सूचक विधान राऊत यांनी केलं.

एका दरोडेखोराला ज्याप्रकारे अटक होते, त्याप्रमाणे मला अटक करण्यात आली. दोनशे-तीनशे पोलीस बोलावण्यात आले, असं नारायण राणे आज जनआशीर्वाद यात्रेत म्हणाले. एका केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. त्यावर बोलताना ही वेळ राणेंवर का आली, याचा अभ्यास केल्यास बरं होईल, असा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला. राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी केलेली विधानं महत्त्वाची आहेत. अपराध केला असेल तर पोलीस पकडणारच, असंदेखील राऊत पुढे म्हणाले.

आज जनआशीर्वाद यात्रेत बोलताना नारायण राणेंनी अनेक जुन्या प्रकरणांचा उल्लेख केला. त्यालाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. ‘अंकुश राणे या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? त्यांना कोणत्या गाडीतून नेण्यात आलं? कुठे जाळण्यात आलं? नारायण राणेंच्या मुलानं चिंटू शेखवर गोळीबार केला. त्याची विचारपूस कधी राणेंनी केली का?’, असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button