स्पोर्ट्स

शाहबाज अहमदची शानदार गोलंदाजी; बंगळुरुचा सलग दुसरा विजय, हैदराबादवर ६ धावांनी मात

चेन्नई : शाहबाज अहमदने एका षटकात घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर ६ धावांनी विजय मिळवला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १४३ धावाच करता आल्या. बंगळुरुकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

आरसीबी आणि सनरायझर्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता. पण यामध्ये अखेर बाजी मारली ती आरसीबीच्या संघाने. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीला हैदराबादपुढे १५० धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले. पण वॉर्नर बाद झाला आणि हैदराबादचा डाव गडगडला. आरसीबीने यावेळी ६ धावांनी हैदराबादवर विजय मिळवला.

आरसीबीच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कारण हैदराबादचा सलामीवीर वृद्धिमान साहा यावेळी फक्त एक धाव काढून आऊट झाला. पण त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांची चांगलीच जोडी जमली. वॉर्नर आणि पांडे या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची दमदार भागीदारी रचली. वॉर्नरला बाद करत आरसीबीचा वेगवान गोलंदाज कायले जेम्निन्सनने ही भागीदीरी फोडली. वॉर्नरने यावेळी ३७ चेंडूंत सात चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर ५४ धावांची भागीदारी रचली.

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी देवदत्त पडीक्कल हा आपला पहिलाच सामना खेळत होता. पहिल्याच सामन्यात पडीक्कलला ११ धावांवरच समाधान मानावे लागले. पडीक्कल बाद झाल्यावर शाहबाद अहमद फलंदाजीला आला आणि त्याने १४ धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला आला. त्यावेळी कोहली आणि मॅक्सवेल यांच्यामध्ये चांगली भागीदारी होईल, असे वाटत होते. पण त्यावेळी मोक्याच्या क्षणी कोहली बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. कोहली बाद झाल्यावर काही चेंडूंतच एबी डिव्हिलियर्सही बाद झाला आणि आरसीबीचा संघ अडचणीत सापडला. पण त्यानंतर मॅक्सवेलने अर्धशतक झळकावले आणि आरसीबीला हैदराबादपुढे १५० धावांचे आव्हान ठेवता आले.

कोहली आणि डिव्हिलियर्स हे दोघेही महत्वाचे खेळाडू आऊट झाले असले तरी मॅक्सवेलने यावेळी अखेरपर्यंत किल्ली लढवला. मॅक्सवेलने अखेरच्या काही षटकांमध्ये तळाच्या फलंदाजांना साथीला घेतले आणि आरसीबीची धावसंख्या वाढवली. मॅक्सवेलने यावेळी ४१ चेंडूंत ५ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारली.

एका षटकात ३ गाडी बाद आणि सामना फिरला

विराट कोहलीने १७ वे षटक युवा शाहबाझ अहमदला दिले आणि सामना त्याने फिरवला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाहबाझने जॉनी बेअरस्टोला बाद केले आणि हैदराबादला तिसरा धक्का दिला. बेअरस्टोला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाहबाझने स्थिरस्थावर झालेल्या मनीष पांडेला बाद केले आणि आरसीबीला मोठे यश मिळवून दिले. कारण खेळपट्टीवर मनीष हा एकच स्थिरस्थावर झालेला फलंदाज होता आणि तो सामना फिरवू शकत होता. मनीषला यावेळी ३८ धावांवर समाधान मानावे लागले. सलग दोन चेंडूंवर शाहबाझने विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे आता तिसऱ्या चेंडूवर शाहबाझ हॅट्रिक साधणार का, याची उत्सुकता चाहत्यांना होती. त्यावेळी विजय शंकर हा फलंदाजी करत होता. शाहबाझचा तिसरा चेंडू शंकरने बचावात्मकपणे खेळला आणि शाहबाझची हॅट्रिक हुकली. चौथ्या चेंडूवर शंकरने एक धाव काढली. ही या षटकातील एकमेव धाव ठरली. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शाहबाझने धडाकेबाज फलंदाज अब्दुल समदला बाद केले. समदला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे शाहबाझने १७व्या षटकात तीन विकेट्स घेत सामना आरसीबीच्या बाजूने झुकवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शाहबाझ यावेळी आरसीबीसाठी मॅचविनर ठरल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button