अर्थ-उद्योग

आरबीएल बँकेवर आता रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अनियंत्रित व्यवहार केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशातच आरबीआयने पुन्हा एका बँकेवर कारवाई केली आहे. आरबीएल (रत्नाकर बँक लिमिटेड) असे या बँकेचे नाव आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीएल बँकेसाठी आता अतिरिक्त संचालक नियुक्त केले आहेत. बँकेच्या कामकाज आणि आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने योगेश दयाल यांची बँकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे . ही नियुक्ती २४ डिसेंबर रोजी करण्यात आली असून त्यांचा कार्यकाल हा २३ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. योगेश दयाल हे सध्या रिझर्व्ह बँकेचे कम्युनिकेशन्स प्रभारी म्हणून पदभार सांभाळत आहेत.

आरबीएल बँकेच्या वतीने योगेश दयाल यांचे बोर्डात सहभागी झाल्याने स्वागत करण्यात आलेय. त्यांच्या अफाट अनुभवाचा फायदा होईल असे आरबीएलने सांगितले आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने आरबीएल बँकेच्या संचालक मंडळाचा अर्ज फेटाळला होता. ज्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विश्ववीर अहूजा यांचा कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आरबीआयने त्यांचा कार्यकाळ केवळ १ वर्षांसाठी वाढवला, अहूजा २०१० पासून आरबीएल बँकेचे प्रमुख आहेत. त्यांचा कार्यकाळ आता जून २०२२ पर्यंत वाढवण्यात आला आहे.

आरबीएल बँकेच्या वतीने असे सांगण्यात आले की, आरबीएल बँकेच्या संचालक मंडळाने एमडी आणि सीईओ विश्ववीर अहुजा यांची तत्काळ रजेवर जाण्याची मागणी स्वीकारली आहे. बोर्डाने विद्यमान कार्यकारी संचालक राजीव अहुजा यांची तत्काळ प्रभावाने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD आणि CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. बोर्डाच्या या निर्णयाला सध्या नियामक मंजुरीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै-सप्टेंबर या तीन महिन्यात बँकेच्या मायक्रो फायनान्स बुकमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर, नफ्यावर आणि गुणवत्तेवर परिणात झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत बँकेचा एकूण नफा ३१ कोटींच्या घरात होता. त्यात वार्षिक आधारावर ७८ टक्क्यांची घट नोंदवली गेली. सप्टेंबर तिमाहीत बँकेचा एकूण एनपीए ५.४ टक्के होता. जून तिमाहीत नॉन परफॉर्मंग मालमत्तेचे प्रमाण ४.९९ टक्के होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button