अर्थ-उद्योग

सारस्वत, एसव्हीसी बँकेसह ४ बँकांवर ‘आरबीआय’ची कारवाई

मुंबई : नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (‘आरबीआय’)चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. आरबीआयने मंगळवारी हैदराबादमधील आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर ११२.५० लाखांचा दंड आकारला.

भारतीय रिझर्व बँकेने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर ६२.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय मुंबईच्या एसव्हीसी सहकारी बँकेवर ३७.५० लाख रुपये आणि मुंबईच्याच सारस्वत सहकारी बँकेवर २५ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

केंद्रीय बँकेच्या मते आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर ‘ठेवीवरील व्याज दर’ आणि ‘आपले ग्राहक ओळखा’ या संबंधित आरबीआय निर्देशांचं पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तर अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला ‘ठेवीवरील व्याज दरा’वरील मास्टर निर्देशात असलेल्या निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

एसव्हीसी सहकारी बँकेने ‘ठेवीवरील व्याज दर’ आणि ‘फसवणुकीचे निरीक्षण व अहवाल देणारी यंत्रणा’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितलं. ‘ठेवीवरील व्याज दर’ आणि ‘ठेव खाती देखभाल’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सारस्वत सहकारी बँकेला दंड आकारण्यात आला. आरबीआयने म्हटलं आहे की नियामक अनुपालनातील कमतरतेच्या आधारे हा दंड आकारण्यात आला आहे. यातून बँकांनी त्यांच्या ग्राहकांद्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता दर्शवण्याचा हेतू नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button