Top Newsस्पोर्ट्स

रवी कुमार दहियाची धडाकेबाज कामगिरी; कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

टोक्यो : नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय खेळाडूचा मान कुस्तीपटू रवी कुमार दहियाला पटकावण्यात अपयश आलं. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्लाला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रवीच्या या पदकासोबतच भारताची यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदक संख्या ५ झाली आहे.

रवी कुमार आणि युगूएव्ह यांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ केला. रवीनं पकड करण्याचे प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूनं अपयशी ठरवले अन् पहिला गुणही घेतला. रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उताना पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले.

https://twitter.com/AkashvaniAIR/status/1423242597661691907

हॉकीनंतर भारतीयांना कोणत्या सामन्याची उत्सुकता होती, तर ही रवी कुमार दहिया याची… २०१२ नंतर भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत पहिले पदक जिंकून देण्याचा मान रवी कुमारनं पटकावला. त्यानं उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव्ह नुरीस्लॅम याचा पराभव केला. यावेळी रडिचा डाव खेळत त्याने रवीच्या दंडावर चावा घेतला. त्याने घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरला होता.

भारताचा पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. रवीने सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला मात देत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं होतं. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारताचा सुवर्णपदक नक्कीच मिळवून देईल असे वाटत होते. त्याने अंतिम सामन्यात खेळही तसाच केला. अगदी चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर वेळेची मर्यादा असल्याने रवी ३ गुणांनी कमी पडला आणि त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं.

भारताच्या खिशात पाच पदकं

यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी चांगली ठरत आहे. भारताने आतापर्यंत ५ पदकं मिळवली असून आणखी काही भारताचे महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. पाच पैकी दोन रौप्य तर तीन कांस्य पदकं आहेत. यात सर्वांत आधी वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूने रौैप्यपदक, त्यानंतर पीव्ही सिंधूने टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं. ज्यानंतर बुधवारी लवलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्य तर आज सकाळी हॉकी पुरुष संघाने कांस्य पदक मिळवून देत भारतासाठी पदकांचा चौकार मारला. ज्यानंतर आता रवी दहियाने रौप्य पदक जिंकत पदकांची संख्या पाच केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button