अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेआहेत. अशी माहिती भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिली. सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन परब यांच्या रिसॉर्टबाबत तक्रार केली होती. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी ईडी, सीबीआई, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी परब यांच्याबाबत अजून एक मोठं वक्तव्य केलं होतं. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ईडी, सीबीआई, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्विट करत सोमय्या यांनी परब यांच्याविरोधात गंभीर आरोप केला होता.
किरीट सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलं होतं. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असं परब म्हणाले होते.