रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल; भुजबळांचाही टोला
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रावसाहेब दानवे यांनाच टोमणा लगावला. रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत भुजबळांनी टोला लगावला.
मुंबईत पत्रकार परिषदेत भुजबळ म्हणाले, चांगली गोष्ट आहे.राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर हरकत काय?
काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होतोय या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील ५ वर्षे भाजपने शिवसेनेला कशी वागणूक दिली सगळ्यांना माहित आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेले मंत्रीपद आणि केलेली अवहेलनाही पाहिली, असं भुजबळ म्हणाले. सरकारमध्ये असून दिलेली वागणूक याचा लेखा जोखा मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे मला असं काही वाटत नाही. महाविकास आघाडीला धोका नाही, महाविकास आघाडीपासून इतरांना धोका असू शकेल, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
ज्या पोटनिवडणुका आहेत त्या आणि ज्या मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी पंचवार्षिक निवडणुका आहेत, तिथलं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपण अध्यादेशाचा मार्ग स्वीकारला आहे. तामिळनाडू आणि इतर राज्यांनीही हा मार्ग अवलंबला आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. आमची राज्यपालांना विनंती आहे लवकर अध्यादेशावर स्वाक्षरी करावी. ओबीसींच्या भल्यासाठी ते निर्णय घेतील अशी खात्री आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रात तरी स्वतंत्रपणे काम करतोय. मी आताच मुख्यमंत्र्यांशी बोललो. परवा मंत्रिमंडळाने अध्यादेश मंजूर केला. त्याचे प्रारुप तयार होतंय. हा अध्यादेश आज राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवला जाईल. राज्यपालांची स्वाक्षरी झाली की हा अध्यादेश निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, असं छगन भुजबळ म्हणाले.
सोनू सूदने एवढं चांगलं काम केल्यावर त्याने भाजपचा प्रचार केला नाही. त्याने दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला. त्यामुळे आता ते (भाजप) आपलं काम करत आहेत. सोनू सूदने भाजपचं ब्रॅडिंग केलं असतं तर त्याला त्रास झाला नसता, असा हल्लाबोलही भुजबळांनी केला.