मराठा आरक्षणावरुन रावसाहेब दानवेंनी ठाकरे सरकारला फटकारले
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा महाविकास विकास आघाडी सरकारला फटकारलं आहे. नारायण राणे समिती स्थापन केली आणि त्या आधारावर तुम्ही आरक्षण दिलं. त्या काळात केंद्र आणि राज्यातही तुमचं सरकार होतं. जर हा विषय केंद्राचा होता तर मग केंद्राला डावलून तुम्ही आरक्षण कसं दिलं? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारलाय. आज राजकीय परिस्थिती बदलली तर तुम्ही केंद्राकडे बोट दाखवत आहात. त्यावेळी जर तुम्ही कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतला असता तर ही वेळ आली नसती, असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण यांनी घालवलं. ज्या गोष्टीत यांना अपयश येतं त्या गोष्टीबाबत हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे विषय केंद्राकडे ढकलायचे, मग हे काय करतात? मुळात हे अनैसर्गिक सरकार आहे. अमर, अकबर, अॅन्थनीचं सरकार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर ज्या प्रमाणे एकाचं तोंड एकिकडे तर दुसऱ्याचं दुसरीकडे असं तसंच या सरकारचं आहे. राज्य सरकारमध्ये अंतर्गत कलह आहे, म्हणूनच हे निर्णय करु शकत नाहीत. त्याचा फटका जनतेला बसत असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केलीय.