सिंधुदुर्गः गेल्या काही दिवसांपासून कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू होती. जिल्हा बँक पुन्हा नारायण राणेंच्या ताब्यात जाणार की महाविकास आघाडी सत्ता मिळवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु जिल्हा बँकेची सत्ता पुन्हा एकदा राणेंच्या पर्यायानं भाजपच्या ताब्यात आलीय. यामध्ये सर्वात चर्चेचा विजय ठरला तो विजय देसाई यांचा. देवेश एडके या मुलाने चिठ्ठी काढून देसाई यांना कौल दिला आहे. विशेष म्हणजे देवेशने चिठ्ठी काढून कौल दिल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांना पराभव पत्करावा लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत दोन दिग्गज पराभूत झालेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा पराभव झालाय. ११-८ च्या फरकाने भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनलने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर दणदणीत विजय मिळवला असून, सहकार समृद्धी पॅनलचा धुव्वा उडालाय.
भाजपच्या विठ्ठल देसाई यांनी ईश्वरचिठ्ठीच्या मदतीनं विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव केलाय. तर भाजपच्या अतुल काळसेकरांनी मविआच्या विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवींना पराभवाची धूळ चारली. तर दुसरीकडे राजन तेलींचा वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी पराभव केलाय. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था या मतदारसंघातून भाजपच्या राजन तेलींचा पराभव झालाय. राजन तेली यांचा पराभव करणारे सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे चुलत बंधू आहेत. आतापर्यंत १९ जागांचे निकाल जाहीर करण्यात आलेत. त्यातील ८ जागा महाविकास आघाडीला, तर ११ जागा भाजपनं जिंकल्यात. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ९८१ पैकी तब्बल ९६८ मतदारांनी म्हणजे ९८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये ११५ महिला व ८५३ पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नव्हतं.
खणखणीत नाणे, नारायण राणे
भाजपच्या हाती जिल्हा बँक येताच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खणखणीत नाणे, नारायण राणे आणि आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तर काही जणांनी नितेश राणेंचे फोटोही व्हायरल केले आहे. या फोटोवर ‘गाडलाच’ असं लिहिलं आहे.
चिमुरडा म्हणतो न घाबरता चिठ्ठी काढली
विजय देसाई आणि सतीश सावंत यांना या निवडणुकीत समान मतं मिळाली. त्यामुळे विजयी उमेदवार ठरवणं कठीण होऊन बसल्यामुळे शेवटी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करण्याचे ठरले. दोन्ही उमेदवारांचे भविष्य ठरवण्यासाठी देवेश नरेंद्र एडके या साडेतीन वर्षाच्या मुलाची निवड करण्यात आली. त्यानंतर देवेश याने सतीश सावंत यांच्याविरोधात उभे राहिलेले विठ्ठल देसाई यांचे नाव असलेली चिठ्ठी काढली. या एका चिठ्ठीनंतर सावंत यांचा पराभव झाला तर देसाई यांच्या गोटात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. एवढी मोठी जबाबदारी पार पाडताना या छोट्या देवेशने न घाबरता चिठ्ठी काढली आहे. तर या कामासाठी देवेशची निवड झाली याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईने दिलीय.
मतदारसंघ निकाल
१) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका
विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी
सतीश सावंत (महाविकास आघाडी) – पराभूत
२) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका
विद्याप्रसाद बांदेकर (महाविकास आघाडी) – विजयी
प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत
सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत
३) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका
विद्याधर परब (महाविकास आघाडी)- विजयी
गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत
४) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका
व्हिक्टर डान्टस (महाविकास आघाडी) – विजयी
कमलाकांत कुबल (भाजप) – पराभूत
५) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका
मनीष दळवी (भाजप) – विजयी
विलास गावडे (महाविकास आघाडी) – पराभूत
६) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका
प्रकाश बोडस (भाजप) – विजयी
अविनाश माणगावकर (महाविकास आघाडी) – पराभूत
७) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका
गणपत देसाई (महाविकास आघाडी) – विजयी
प्रकाश गवस (भाजप) – पराभूत
८) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका
दिलीप रावराणे (भाजप) – विजयी
दिगंबर पाटील (महाविकास आघाडी) – पराभूत
९) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ
सुशांत नाईक (महाविकास आघाडी) – विजयी
राजन तेली (भाजप) – पराभूत
१०) महिला प्रतिनिधी
प्रज्ञा ढवण (भाजप) – विजयी
अनोरोजीन लोबो (महाविकास आघाडी) – पराभूत
११) महिला प्रतिनिधी
नीता राणे (महाविकास आघाडी)- विजयी
अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत
१२) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
आत्माराम ओटवणेकर (महाविकास आघाडी) – विजयी
सुरेश चौकेकर (भाजप) – पराभूत
१३) इतर मागास मतदारसंघ
रवींद्र मडगावकर (भाजप) – विजयी
मनिष पारकर (महाविकास आघाडी) – पराभूत
१४) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ
मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी) – विजयी
गुलाबराव चव्हाण (भाजप) – पराभूत
१५) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ
अतुल काळसेकर (भाजप) – विजयी
सुरेश दळवी (महाविकास आघाडी) – पराभूत
१६) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ
गजानन गावडे (भाजप) – विजयी
लक्ष्मण आंगणे (महाविकास आघाडी) – पराभूत
१७) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ
महेश सारंग (भाजप)- विजयी
मधुसूदन गावडे (महाविकास आघाडी)- पराभूत
१८) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था
संदीप परब (भाजप)- विजयी
विनोद मर्गज (महाविकास आघाडी)- पराभूत
१९) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ
समीर सावंत (भाजप)-विजयी
विकास सावंत (महाविकास आघाडी)- पराभूत
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अख्खी चिवसेना ओकत होती. पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल, असं वर्गणी चोरांना वाटतं होतं. पण ही सिंधुदुर्गाची माती आहे, इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला, कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 31, 2021
‘गाडलाच’ फोटो व्हायरल
विशेष म्हणजे अटकेची टांगती तलवार असतानाच नितेश राणेंनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये नितेश राणेंनी एक फोटो शेअर केलाय, त्या फोटोला गाडला अशी कॅप्शन दिलीय. फोटोमध्ये सतीश सावंतांच्या अंगावर नितेश राणे उभे असलेलं पाहायला मिळतंय. पण नितेश राणे गायब असूनही सोशल मीडियावर सक्रिय असल्यानं पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या शोधाची तपासचक्रे गतिमान केली आहेत.
दुसरीकडे गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो लावण्यात आला असून, ते हरवले आहेत, असं लिहिलंय. तसेच त्यांना शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल, असंही लिहिलंय. त्यामुळे राणेंना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यानंतर नितेश राणेंची ही फेसबुक पोस्ट आल्यानं चर्चांना उधाण आलंय.