फक्त हिंदू सणांनाच आडकाठी का? आ. राम कदम यांचा ठाकरे सरकारला सवाल
मुंबई: फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होळीचा सण (Holi 2021) साजरा करण्यात काय गैर आहे? इतर धर्माच्या लोकांच्या सणांना परवानगी दिली जाते. ते लोक कोरोनाचे नातेवाईक आहेत का, याचे उत्तर वसुली सरकारने द्यावे, अशी टीका भाजपचे आ. राम कदम यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकार फक्त हिंदू सणांनाच आडकाठी का करते, असा सवाल राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला.
राम कदम यांनी रविवारी ट्विट करत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारकडून होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईत नेहमीप्रमाणे धुळवड साजरी करता येणार नाही. यानंतरही नागरिकांनी ऐकले नाहीच तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. अर्थात धुळवड घरातल्या घरात खेळता येईल पण चाळ किंवा इमारतीच्या आवारात सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.