राजकारण

ही तर जन छळवणूक यात्रा; महापौर पेडणेकरांचा भाजपला टोला

मुंबई : कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे, या शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या या यात्रेची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मंदिरे उघडी करण्यात आलेली नाही. राज्याबाहेरची मंदिरे उघडी आहेत. तिथे काळजी घेतली जातेय. पण मंदिरे उघडण्यापेक्षा विरोधकांनी दिल्लीतून व्हॅक्सिन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा चिमटाही पेडणेकर यांनी काढला.

केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे. यापैकी तीन नेत्यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रांना सुरुवात केली असून, केंद्रीयमंत्री नारायण राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करून १९ ऑगस्ट रोजी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहे. काम केले म्हणून ते नंबर पाचमध्ये आले. विरोधकांचे मीठ आळणीच राहिले आहे. मातोश्रीने करून दाखवले. त्यामुळे मातोश्री टार्गेट राहणारच, पण विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसेही आम्हाला कुणी टार्गेट केले तरी काही फरक पडत नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button