राजनाथ सिंहांपाठोपाठ जे.पी. नड्डा यांनाही कोरोनाचा संसर्ग
नवी दिल्ली : दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रात जवळपास ५० पेक्षा जास्त नेते कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता दिल्लीतल्या नेत्यांनाही कोरोनाचा विळखा वाढतोय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डाही कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय, धार्मिक कार्यक्रम आणि कित्येक विवाहसोहळे झाले, त्याला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली असल्याने राज्यात सध्या ५० पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित झाल्याची आकडेवारी समोर आली. मंत्रिमंडळातील डझनभर मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर दिल्लीतल्या नेत्यांची डोकेदुखी वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही एकापाठोपाठ एक नेते कोरोना पॉझिटिव्ह यायला सुरूवात झाली आहे. काही तासांपूर्वीच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिव्ह आल्याची माहिती समोर आली होती, तर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनी भेट घेतलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे टेन्शन आता वाढले आहे.