महाराष्ट्राने कोरोनाचे आकडे लपवले नाहीत, त्यामुळे देशपातळीवर उत्तम काम : टोपे
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसीस हा आजार आगामी काळात नोटीफाईड डिसीज ठरणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिलाय. असं झाल्यास भविष्यात राज्यात कोणत्या जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे किती रुग्ण आहेत आणि या आजाराच्या वाढीचा वेग काय हे सरकारला शोधता येणार आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राने आजपर्यंत कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नसल्याचं स्पष्ट करत यामुळेच राज्याने देशपातळीवर उत्तम काम केल्याचं त्यांनी सांगितलं
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, म्यूकरमायसीस (काळी बुरशी) हा आजार राज्यात नोटीफाईड डिसीज ठरणार आहे. कोरोना टेस्टिंग हाय आणि लो रिस्कमध्येच वाढवली पाहिजे. टेस्टींग कुठे केल्या जातात हेही महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यामुळे उपचार लवकर मिळून मृत्यूदर कमी होण्यास मदत हाते. ग्रामीण आणि तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची गरज आहे. शासन आगामी काळात त्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्याने आजपर्यंत कधीही कोरोनाची आकडेवारी लपवलेली नाही. त्यामुळे राज्याने देशात उत्तम काम केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पेडियाट्रीक टास्कफोर्सच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. आजपर्यंतच्या या कामाचे श्रेय प्रशासनास जाते. लस जशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण सुरुच राहणार आहे. खासगी रुग्णलयांत होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऑडीटर नेमण्यासाठी जिल्हाप्रशासनाने पावले उचलावीत. गृह विलगीकरणाचे प्रमाण कमी करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डॅशबोर्ड अद्ययावत ठेवावा, असंही टोपे यांनी सांगितलं.
रुग्णसंख्या नेमक्या कोणत्या भागात वाढते याचे विश्लेषण करावे, रुग्णवाढीची कारणे समजावून घेवून त्यानुसार उपाययोजना कराव्या, लग्न समारंभासारख्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष द्यावे. घरगुती विलगीकरणातील लोकांमुळे अधिकाधिक रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत असल्याने त्यावर तातडीने, उपायोजना करण्याची गरज आहे तसेच ते नियमांचे काटेकोर पालन करतात की नाही याचे मॉनेटरींग करण्याची गरज आहे.
शेजारील जिल्हे, राज्यातून येणाऱ्या स्थलांतरीत लोकसमुहाचे नियमित सर्वेक्षण करावे, खासगी रुग्णालयांनी रुग्णांचे शोषण करु नये यासाठी योग्य ती पावले उचालावीत, ज्या कुटुंबातील कमावते लोक कोविडमुळे मृत्यूमुखी पडले आहेत अशा कुटूंबाना मदतीसाठी धोरण ठरवावे. विविध शासकीय योजना सीएसआर योजनांचा फायदा अशा कुटूंबांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी प्रशासनाला करण्यात आल्या.