पुणे: काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. उद्या सोमवारी हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.
राजीव सातव यांचे आज पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज आज संपली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीकडे रवाना झाले आहे. रुग्णवाहिकेत सातव यांची आई, पत्नी आणि इतर अप्तेष्ट आहेत. उद्या सकाळी कळमनुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल, असं सूत्रांनी सांगितलं.
सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यथित: राज्यपाल
राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. सातव करोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दुखद बातमी आली. सातव यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून हिरावून नेला आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.