मुंबई : भाजप-मनसे युतीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवल्या आहेत. पुढे काय होईल सांगता येत नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे घेतील. परंतु सध्यातरी मनसेची ‘एकला चलो रे’ भूमिका आहे. लवकर जी काही चांगली बातमी यायची ती येईल असे सूतोवाच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.
मनसेच्या नेत्यांची आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं राज ठाकरे दौरा करणार आहेत. मराठवाड्यात संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र पुणे, कोकणात रत्नागिरी, विदर्भात नागपूर, अमरावती याठिकाणी दौरा होणार आहे. सध्या १४ डिसेंबरला संभाजीनगर तर १६ डिसेंबरला पुण्यात जाणार आहेत. मुंबईत नेत्यांचा मेळावा होईल. या दौऱ्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जातील असंही मनसेकडून सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील असंही बाळा नांदगावकर म्हणाले.
शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप एकाकी पडला. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपला एका साथीदाराची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे. त्यामुळे मनसेची मदत मिळाल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपला मनसेसोबत थेट युती करण्यात अडचणी आहेत. मनसेची परप्रांतीयांबद्दलची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरते. त्यामुळे भाजप-मनसेची जाहीर युती होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र पडद्याआडून दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून मनसेनं हिंदुत्ववादी भूमिका अधिक प्रखरपणे घेतली आहे. पक्षाच्या झेंड्याचा रंगसुद्धा बदलण्यात आला आहे.
भाजपसोबत जाण्याची चर्चा, मात्र स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना
राज्यात सध्या महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेनेही महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे तितक्याच जोमाने उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजपच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. आगामी निवडणुकीत भाजप मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत अनेक राजकीय जाणकारांनी दिले आहेत.
आगामी निवडणुकांत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली, मात्र स्वबळावर निवडणूका लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती. सर्व ठिकाणी पक्षाची परिस्थिती चांगली आहे. अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेचे महाराष्ट्रातील सर्व नेते आणि सरचिटणीस यांची २ तास बैठक झाली. यात महापालिका निवडणुकीबाबत राणनितीवर चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विभागवार मेळावे, बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्याला १४ तारखेपासून सुरूवात होणार आहे.
कोरोनाकाळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं, हॉस्पिटल बिल कमी केली, यावेळी आमचे कार्यकर्ते कोरोना पॉझिटिव्ह होऊन काहींचा मृत्यू झाला असल्याचंही संदीप देशपांडे म्हणालेत. एसटी कर्मचारी संपात कर्मचाऱ्यांना राहण्या-खान्याबाबत मदत केली. या सरकारबाबत लोकांच्या मनात नकारात्मक भूमिका आहे. कोरोनाकाळ, परीक्षा, एसटी संप काहीच नीट धड भूमिका घेतली नाही, अशी टीका मनसेकडून करण्यात आली आहे.
एसटीच्या संपाबाबत बोलताना, एसटीबाबत सहानुभूती भूमिका दाखवली पाहिजे, महामंडळ कधीच फायद्यात येणार नाही. पब्लिक ट्रान्सपोटबाबत विविध राज्यांनी चांगली भूमिका घेतली आहे. असंही मनसे नेते संदीप देशपांडे म्हणालेत.