कोरोना चाचणी अभावी प्रवेश नसल्याने राज ठाकरे विधान भवनातून माघारी
मुंबई : ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते. पण राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड चाचणी करणं आवश्यक होतं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे या आधीच मास्क घालत नव्हते. त्यामुळे विधान भवनात प्रवेश करणार्या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आलेत त्यांचं पालन राज ठाकरे करणार होते का..? हा देखील प्रश्नं विधान भवनात चर्चेत होता. पण अखेर कोरोना चाचणी केली नसल्यामुळे राज ठाकरे विधान भवनात आलेच नाहीत.
राज ठाकरे हे वीजबिल आणि अन्य प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार होते अशी माहिती आहे. त्यासाठी ते मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. मात्र मंत्रालयात विनामास्क आणि विना कोरोना चाचणी प्रवेश नाही याची त्यांना माहिती मिळाली. राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत असं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नाही याची कुणकुण लागल्याने राज ठाकरे माघारी फिरल्याचं सांगण्यात येत आहे.