Top Newsफोकस

पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; कोकण रेल्वे ठप्प

मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर अर्धा तास ते पाऊण तास उशिराने लोकल धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला झोडपले. रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाने सकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे ठाणे ते नाहूर स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झालं. संपूर्ण रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरून रेल्वे धीम्यागतीने सुरू होती. तब्बल अर्धा तास उशिराने लोकल धावत होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला. पाऊस, लोकलचा खोळंबा आणि त्यामुळे झालेली गर्दी यामुळे चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अडचणींना सामोरे जावं लागल्याने चाकरमानी वैतागले होते.

विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचलं होतं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

कांदिवलीत बाप-लेक पाण्यात पडले

दुसरीकडे, जोरदार पावसामुळे मुंबईतील कांदिवली भागातही पोटरीभर पाणी साचलं होतं. कांदिवली वाहतूक चौकीसमोर एक व्यक्ती साचलेल्या पाण्यातून आपल्या लहान मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहातून चालताना फुटपाथला अडखळून तो पडला. यावेळी रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोलीस राजेंद्र शेगर यांनी तत्परता दाखवली आणि ते त्याच्या मदतीला धावून गेले. हा पिता आपल्या मुलीला सुखरुप प्रवाहातून बाहेर काढून जाईपर्यंत त्यांनी सोबत केली आणि बापलेकीला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

वाहतूक विस्कळीत

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. मुंबईत तुफान पाऊस बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतीय.

भांडुप व्हिलेज रोडवर पाणी

भांडूप येथे आज संततधार पाऊस पडत आहे त्याचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे. भांडुप व्हिलेज रोड पाणी साचलेलं आहे. गुडघाभर पाण्यात लोकांना वाट काढावी लागत आहे.

नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

कल्याण-डोंबिवलीत कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ऐरोलीमध्ये पाणी साचल्याने चालकांना आपली गाडी पाण्यातून काढावी लागत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असल्याने वेगळ्या मार्गाचा वापर वाहनधारकांना करावा लागत आहे.

वालधुनी नदीने घेतले रौद्ररूप

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीला आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठा प्रवाह आला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

कोकण रेल्वे मार्गावर गोव्यात थिविम ते करमळी रेल्वे स्थानका दरम्यान दरड कोसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला आहे. पहाटे ४ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे.

कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं कोकणाामध्ये मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याविषयी ट्विट करुन माहिती दिली आङे. संपूर्ण कोकण म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी पाऊस झाला, असंही हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे. हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईत सकाळपासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस होत आहे.

सिंधुदुर्गमध्ये रात्रभर पाऊस

सिंधुदुर्गमध्ये रात्रभर पाऊस झाला,.मात्र पहाटे पासून पावसाची थोडी विश्रांती.काल दुपारनंतर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. नदी नाले रात्री भरून गेले होते. मुसळधार पावसाचा कणकवलीला चांगलाच फटका बसला. सायंकाळी काही दुकानात पाणी शिरले होते. तर, नांदगावमध्ये ही काही घरात पाणी शिरले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला रेड अ‍ॅलर्ट दिला आहे. रत्नागिरीत पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. तर, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरीमध्ये चिपळूण, गुहागर, खेड परिसरात रात्रभर पाऊस पडतोय. पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूणमधील शिवनदी व वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button