राजकारण

रेल्वे मंत्रालयातील कर्मचारी आता दोन शिफ्टमध्ये काम करणार

नवी दिल्ली : अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आता रात्री १२ वाजेपर्यंत काम करताना दिसणार आहेत. मात्र, हा आदेश केवळ मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट ही सकाळी ७ वाजता सुरू होईल. ही शिफ्ट दुपारी ४ वाजता संपेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १२ वाजता संपेल. हा आदेश केवळ एमआर सेलला (मंत्री कार्यालय) लागू राहणार आहे. सर्व रेल्वे कर्मचारी किंवा खासगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजीपीआर डीजे नारायण यांनी दिली.

रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित सर्व कार्यालयांना हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्याने दिले आहेत. त्यानुसार केवळ रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांनाच दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे, असं नारायण यांनी सांगितलं. मिशन मोडसाठी रेल्वेसाठी बरंच काही करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. एमआर सेलचा अर्थ मंत्र्याचं कार्यालय. त्यामुळे हा आदेश केवळ या कार्यालयासाठी लागू असेल, असंही ते म्हणाले. भारतीय रेल्वे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोणाचा एक भाग आहे. रेल्वेवर मोदींचा फोकस असून त्यावर त्याबाबतची त्यांची काही स्वप्ने आहेत, ती सत्यात उतरवण्याचा माझा प्रयत्न आहे, असं वैष्णव म्हणाले.

आपल्या देशाचे पंतप्रधान हे सलग १८ तास काम करतात, मग आम्ही मंत्र्यांनीही तसं काम का करु नये असा सवाल रेल्वे राज्यमंत्र्यांनी केला. पंतप्रधानांकडून प्रेरणा घेत आम्हीही जास्तीत जास्त वेळ काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. दानवे म्हणाले की, भारतीय रेल्वे जनतेच्या सेवेत २४ तास कार्यरत असते. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यामुळेच सर्वसामान्यासह सर्वच घटकातील भारतीयांना प्रवास आणि मालवाहतूक यासाठी रेल्वे जलद आणि सुलभ दळणवळणाचे साधन ठरली आहे. दोन शिफ्ट मध्ये काम केल्यानं रेल्वेच्या कामाला गती मिळेल आणि सेवेत तत्परता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button