राजकारण

रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे, मालेगावात ५२ जणांना अटक

मालेगाव : त्रिपुरातील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये हिंसाचार पेटला. यामागची पाळेमुळे खणून काढली जात आहेत. पोलिसांनी मालेगाव दंगलीप्रकरणी रझा अकदमीच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यात महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे समजते. हे पुरावे लवकरच न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. याप्रकरणीच्या मूळ सूत्रधाराचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. त्याला लवकर बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे.

त्रिपुरा येथील कथित घटनेनंतर मालेगावमध्ये उसळलेला हिंसाचार सुनियोजित होता. त्याची एकेक कडी उलगडायला पोलीस यशस्वी ठरत आहेत. या हिंसाचाराला काही राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी फूस लावल्याचे समोर येत आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. ८ नोव्हेंबरला हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यासारखेच अजून अनेकजण असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सूत्रधाराचा शोध सुरू केला आहे.

त्रिपुरा येथील कथित घटनेविरोधात मालेगावमध्ये रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारला होता. या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांची कसून चौकशी सुरूय. त्यात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली होती. यात महत्त्वाचे कागदपत्रे मिळाले असून, ती कोर्टात सादर करणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे. सीसीटीव्हीचे चित्रण पाहून आरोपींचा शोध सुरू आहे. रझा अकादमीचे अनेक कार्यकर्ते फरार आहेत. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. या प्रकरणी ५२ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी मालेगाव दंगल सुनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा असून, तो सध्या फरार आहे. मुंबईतून रझा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहे. सूत्रधारांचा शोध घ्या आणि त्यांना बेड्या ठोका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button