Top Newsराजकारण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला, तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. मात्र, आता त्यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

राहुल यांनी केलेलं कृत्य हे पोक्सो कायद्यांतर्गत येतं. तसेच भादंविच्या कलम २२८ अ च्या कलम २३ अंतर्गत हा गुन्हा आहे, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरमी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस देऊन हे ट्विट हटवण्यास सांगितलं होतं. तसेच या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यासही सांगितलं होतं.

या प्रकरणात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मंगळवारी ट्विटर इंडियाला नोटीस जारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर पॉक्सो कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं आहे. तसंच त्यांना या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासही सांगण्यात आलंय. त्यामुळे आता राहुल गांधी काय बाजू मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button