अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपुरातील घरांवर सीबीआयचे छापे

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यापासून त्यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांच्यामागे ईडी, सीबीआय तसेच तसेच आयटी विभागाची चौकशी लागलेली आहे. यातही भर म्हणून की काय आजदेखील देशमुख यांच्या मुंबई, आणि नागपूरवरील घरावर सीबीआयने पुन्हा एकदा धाड टाकली. सीबीआयची टीम देशमुख यांच्या मुंबईतील बंगल्यात तब्बल अडीच तास होती. विशेष म्हणजे या बंगल्यात सीबीआयच्या तीन सदस्यांनी तपास केला आहे. या अधिकाऱ्यांनी आपला तपास पूर्ण केला आहे. तसेच नागपुरातदेखील देशमुख यांच्या बंगल्यावर सीबीआयच्या टीमने आजच धाड टाकली. येथील अधिकाऱ्यांनीदेखील आपला तपास पूर्ण केला आहे. नागपुरात सकाळी आठ वाजल्यापासून अधिकाऱ्यांचा तपास सुरु होता.
अनिल देशमुख यांची आर्थिक गैरव्यवहार तसेच १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. याच आरोपाप्रकरणी त्यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यासमोरील संकट अजूनही संपलेले नाही. त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर आज पुन्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी संपूर्ण बंगल्याची झडती घेतल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच तास आपला तपास केला. या संपूर्ण तपासादरम्यान बाहेरच्या व्यक्तीला बंगल्यात येण्यास सक्त मनाई होती. सीबीआयच्या तीन सदस्यीय टीमने देशमुख यांच्या घरी तपास केला आहे. तब्बल अडीच तास तपास चालला असला तरी यामध्ये अधिकाऱ्यांच्या हातात नेमक्या कोणत्या गोष्टी सापडल्या किंवा अधिकाऱ्यांनी नेमका कशाचा तपास केला ? याची ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरातसुद्धा सीबीआयने धाड टाकली. येथे सकाळी आठ वाजेपासून तपास सुरु होता. देशमुख यांच्या घरातून दुपारी दोन वाजता दोन अधिकारी बाहेर पडले होते. त्यानंतर सुमारे साडे तीन वाजता बाकीचे अधिकारी देशमुख यांच्या घराच्या बाहेर पडले. यावेळी देशमुख यांच्या समर्थकांनी त्यांच्या जोरदार घोषणाबाजी केली.
एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?; जयंत पाटलांचा सवाल
सीबीआयच्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल केला आहे. एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. आज बंद असताना अनिल देशमुख यांच्या घरी छापे मारण्यात आले. बंदकडून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी असे छापे मारले जातात. छापे मारुन किती वेळा मारणार, एकाच घरावर कितीवेळा छापे झाले? असा सवाल पाटील यांनी केला.
हे मुघलांचं राज्य आहे : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही देशमुख यांच्या सूनेला आलेल्या अटक वॉरंटवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही. या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती. कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.