Top Newsराजकारण

महागाईच्या मुद्यावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर बोचरी टीका

नवी दिल्ली : दिवाळीत केंद्राने आणि काही राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या करामध्ये मोठी कपात केली आहे. यामुळे वाहन चालविणाऱ्या तसेच मालवाहतूक करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी घरगुती गॅस सिलिंडर अद्याप महागडाच आहे. १ नोव्हेंबरला व्यावसायिक गॅस सिलिंडरमागे २०० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना महागाईचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, एका सर्व्हेमध्ये देशातील ग्रामीण भागात जवळपास ४२ टक्के लोकांनी गॅस सिलिंडर सोडून पुन्हा लाकडावर जेवण बनविण्यास सुरुवात केली आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विकासाच्या आश्वासनांपासून कित्येक मैल दूर असलेल्या लाखो परिवारांवर पुन्हा चूल फुंकण्याची वेळ ओढवली आहे. मोदीजींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये आहे आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल आहेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

ग्रामीण भागात मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजना सुरु केली आहे. याचे काही कोटींमध्ये कनेक्शन दिले गेलेले असले तरीदेखील या लोकांकडे ८००-९०० रुपयांचा गॅस सिलिंडर भरणे कठीण जात आहे. कोरोनामुळे या लोकांचे उत्पन्न रोडावले आहे. द टेलिग्राफने याबाबतचा रिपोर्ट छापला आहे. हा सर्व्हे झारग्राम आणि वेस्ट मिदनापुर परिसरातील १०० हून अधिक गावांमध्ये करण्यात आला. १०० हून अधिक गावांतील ५६० घरांचा सर्व्हे करण्यात आला. हे लोक महागाईमुळे पुन्हा चुलीवर आले आहेत.

गॅस न वापरण्यामागे तीन मुख्य कारणे समोर आली आहेत. गॅसच्या दरांमध्ये झालेली मोठी वाढ, दुसरे उपलब्धता आणि तिसरे आहे ते म्हणजे लॉकडाऊनमुळे लोकांचे कमी झालेले उत्पन्न. गॅसचा खर्च झेपत नसल्याने पुन्हा हे लोक जंगलातील लाकडांवर अवलंबून राहू लागले आहेत. अनेकांनी गॅस सिलिंडर आणि शेगडीला कोपऱ्यात किंवा स्टोअर रूममध्ये ठेवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button