नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधल्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज तिथं जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आज लखीमपूरला जाण्याची परवानगी मागितली होती. पण योगी सरकारनं त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्रानं शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप झाल्यानंतर लखीमपूरमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर तिथं कलम १४४ लागू करण्यात आलंय. राजकीय पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही वाटेतच रोखून त्यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज लखीमपूर खेरीला भेट देण्याची शक्यता आहे. या संदर्भात, काँग्रेसनं उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे की, ज्याप्रमाणे टीएमसी नेत्यांना लखीमपूर खेरी घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांना परवानगी द्यावी. राहुल गांधी अशावेळी लखीमपूर खेरीला भेट देण्याचा विचार करत आहे, जेव्हा त्यांची बहीण प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात आहे.