नवी दिल्ली : देशातील जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसोबत काम केलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उघडपणे आणि ममतांच्या वक्तव्यांच्या अगदी उलटे मत मांडले. काँग्रेसशिवाय बलशाली विरोधी पक्ष होण्याची शक्यता कमी आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. याच बरोबर एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, भाजप उत्तर प्रदेशात २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये अधिक जागा आणू शकतो, असेही म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांना एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातील रॅपिड फायर राऊंडमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले. याला त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तरे दिली. यादरम्यान, असा कोणता नेता आहे, की ज्याच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी नितीश कुमारांचे नाव घेतले. यावेळी, आपले नितीश यांच्याशी बोलणे होते का, असे विचारले असता, ते म्हणआले, ‘माझे बोलणे सुरू असते.’ खरे तर, प्रशांत किशोर यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये जेडीयूमध्ये सामील होऊन राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण त्यांनी लवकरच पक्ष आणि राजकारण दोन्ही सोडले.
याशिवाय, असा कोणता नेता आहे, ज्याच्यासोबत कधीच काम करायला आवडणार नाही? असा प्रश्नही पीके यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी त्यांना राहुल गांधी, अमरिंदर सिंग, नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी हे पर्याय देण्यात आले होते. यावर त्यांनी अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले.
राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात की नाही, या प्रश्नावर किशोर यांनी ते पंतप्रधान होऊ शकतात, असे उत्तर दिले. याचबरोबर गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्ष चालू शकतो, असेही ते म्हणाले. प्रशांत किशोर यांना, गांधी कुटुंबीय काँग्रेसला बिगर गांधी नेत्याच्या नेतृत्वाखाली चालवू देतील का असा प्रश्नही विचारला असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मात्र, काँग्रेसच्या उर्वरित नेत्यांची इच्छा असेल तर हे होऊ शकते, असेही ते म्हणाले.