
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याबद्दल पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी हे छोट्या आणि खासगी दौऱ्यावर गेले आहेत. भाजप आणि त्यांच्या मीडियातील मित्रांनी विनाकारण अफवा पसवू नये, असं ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या दौऱ्यावरुन राहुल गांधींना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं.
राहुल गांधी यांचा परदेश दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंज, गोवा आणि मणिपुरमध्ये आगामी निवडणुकांसाठी अनेक पक्ष जोर लावत आहेत. राहुल गांधी ३ जानेवारी रोजी पंजाबमधील मोगा जिल्ह्यात पक्षाच्या एका रॅलीला संबोधित करणार होते. परंतु आता ते यासाठी उपस्थित असतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर अनेकदा परदेश दौऱ्यावरुन टीका करण्यात आली होती. यापूर्वी काही वेळा देशात महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या चर्चांदरम्यानही राहुल गांधी अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले होते. दरम्यान, नववर्षापूर्वीच राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशात गेल्याचं समोर आलं आहे. सध्या त्यांच्या या दौऱ्यावरुन सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. पुढील काही महिन्यांत पाच राज्यांच्या निवडणुकादेखील आहेत.
नुकतंच संसदेच्या पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी जवळपास एका महिन्याच्या परदेश दौऱ्यावरुन राहुल गांधी परतले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच ते परतले होते. सध्या ते पुन्हा परदेश दौऱ्यावर गेले असून प्रवक्त्यांनी त्यांचा दौरा खासगी असल्याचं म्हटलं. परंतु ते कधी परतणार याची माहिती दिली नाही.