मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एनसीबीने मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल या घटनेला वेगळचं वळण दिलं आहे. एनसीबीनं धमकावून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. किरण गोसावी गायब झाल्यापासून आपल्या जीवाला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे नेते आणि सातत्याने याप्रकरणी भाष्य करणारे मंत्री नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, या प्रकरणात एक अधिकारी संशयास्पद आहे. सगळी यंत्रणा चुकीची आहे, असं मी म्हणत नाही. पण, ज्यादिवशीपासून समीर वानखेडे या विभागात आले, तेव्हापासून त्यांनी खोट्या केसेस बनवायला सुरुवात केली. फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करुन प्रसिद्धी मिळवायची, दहशत निर्माण करायची आणि मोठं वसुली रॅकेट या माध्यमातून निर्माण करायचं सुरू झाल्याचं आम्ही अगोदरपासूनच सांगत होतो, असे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसेच, आता, हा विषय पुढे आला असून गोसावीच्या माध्यमातून ही पैसे वसुली सुरू झालेली आहे. आता, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, यासंदर्भात एक एसआयटी नेमून चौकशी सुरू केली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
२५ कोटींच्या डीलचा संवाद
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे २५ कोटींची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यात धक्कादायक म्हणजे त्यात १८ कोटींवर डील झाली आहे. हा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी केला आहे.
प्रभाकरनं आरोप केला आहे की, गोसावीला २५ कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील १८ कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले ८ कोटी रुपये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं.
क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे १५ मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला १० साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
आपण गोसावी यांना ५० लाख रोख रक्कम भरलेल्या २ पिशव्या दिल्या. तसंच १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता गोसावीनं फोन केला आणि २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.
मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता. छापेमारीवेळी सावधतेने काही व्हिडीओ आणि फोटो घेतले गेले. एका व्हिडीओत स्पष्टपणे दिसत होतं की, गोसावीने ताब्यात घेण्यापूर्वी आर्यन खान कुणाशी तरी फोनवरुन संवाद साधत होता. या कारवाईमागे मोठं षडयंत्र असल्याचा संशय प्रभाकर साईलनं व्यक्त केला आहे.
एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीचे अधिकारी, मी, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली इतकेच उपस्थित होतो, अन्य कोणीही पंच उपस्थित नव्हते. माझ्या जीवाला धोका असल्याने सोलापूरला जाऊन राहिलो होतो. पंच असूनही आता कुटूंबीयांना धोका असल्याने सर्व सत्य सांगत आहेत अशी कबुली प्रभाकर साईलनं दिली.
समीर वानखेडे यांनी आरोप फेटाळले
एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले की, मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईन.
एनसीबीचे निवेदन; वानखेडेंची पत्रकार परिषद तिसऱ्यांदा रद्द
प्रभाकर साईल यांनी जो काही दावा केलाय, एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर जो काही आरोप केलाय तो केवळ ऐकीव माहितीवर आधारित आहे, त्याने आपले मत हे न्यायालयात मांडावं असं एनसीबीने म्हटलं आहे. एनसीबीने एक प्रेस नोटच्या माध्यमातून हे सांगितलं आहे. दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करणार होते पण तब्बल तिसऱ्यांदा ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.
प्रभाकर साईल हे या प्रकरणातील महत्वाचे साक्षीदार असल्याने आणि हे प्रकरण सध्या न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने, त्यांना जे काही सांगायचं आहे ते अॅफिडेव्हिटच्या माध्यमातून न्यायालयात सादर करावं. या प्रकरणी प्रभाकर साईल यांनी काही व्यक्तींच्यावर आरोप केला आहे तो फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहे.
आमचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केलं आहे. यातील काही माहिती ही तपासाबाबत अत्यंत महत्वाची आहे आणि न्यायप्रलंबित आहे. त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेलं अॅफिडेव्हिट हे एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत आहोत आणि प्रभाकर साईल यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती करत आहोत.