मुंबई : नारायण राणे यांच्या वक्तव्यावर राग नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वातंत्र्यदिनाचं अज्ञान उघड झालं त्याचा थयथयाट आहे. १५ ऑगस्टला महाराष्ट्राला संबोधित करताना मुख्यमंत्री हा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव याबाबत अज्ञान जाहीर करतायेत. की जाणुनबुजून केले जातेय की अजाणतेपणे झालंय? १५ ऑगस्ट हा देशवासियांच्या अभिमानाचा दिवस असताना मुख्यमंत्री मुख्य सचिवांना विचारतायेत. हे लपवण्याचा त्यांचा थयथयाट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागणार आहे का? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला. दरम्यान, राज्यातलं सरकार अवैधपणे दबावतंत्राचा वापर करतंय असा आरोपही शेलारांनी केला. पोलीस बाजूला ठेऊन आंदोलनाला या मग आपण दोन होत करू असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवं. भाजपा युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आहे हे सांगणार आहे. त्याचसोबत त्यानंतरही आठवत नसेल तर फुलांऐवजी काटे पाठवू. १५ ऑगस्टनंतर काही दुर्देवी घडामोडी घडल्या. सुभाष जाधव या शेतकऱ्याने सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली. २२ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. इंदापूर तालुक्यातील शिवाजी चिमळकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पालघरमधील काळू पवार यांनी ५०० रुपयांचे कर्ज मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतलं. हे कर्ज फेडलं नाही म्हणून सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारविरोधात जनक्षोभ वाढतोय. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेच्या लोकांनी महाराष्ट्रभर आंदोलन करतात असं त्यांनी सांगितले.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद https://t.co/muvoOvyOcx
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 25, 2021
शरद पवारांचे दिले उदाहरण
शिवसेनेकडून गलिच्छ राजकारण केले जात आहे. अदखलपात्र गुन्ह्यात तुम्ही केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. पण एक गोष्ट लक्षात असू द्या सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहोत. संयम आणि संस्कृतीची भाषा शिवसेनेचे लोक करतात त्यांना सल्ला आहे. शरद पवारांना एका व्यक्तीने कानशिलात लगावली. तेव्हा मोठ्या मनानं पवारांनी त्या माणसाला माफ केले होते. संयमित माणसासोबत राहून संकुचितवृत्तीचं दर्शन शिवसेनेचे लोक घडवतायेत असा टोलाही शेलारांनी लगावला आहे.
दरम्यान, नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची भीती सरकारमध्ये का आहे? कोकणातील कुठल्याही माणसाला सन्मानाचं स्थान दिल्लीत मिळालं तरी शिवसेनेच्या पोटात दुखतं. सुरेश प्रभूंचाही अपमान केला गेला. राणेंना केंद्रीय मंत्री केल्यापासून उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या पोटात दुखायला लागलं हे सत्य आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा केंद्रीय मंत्र्याला अटक केली. ठाकरे सरकारनं काल जे काही केले तो तालिबानी कारभार होता.
अनिल परब व्हायरल क्लीप प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
अनिल परब यांची सोशल मीडियावर क्लीप व्हायरल झाली आहे. त्यात पोलीस अधिकाऱ्यावर कशारितीने दबाव टाकत होते ते दिसत होते. कोर्टात सुनावणी झाली नसतानाच त्यांच्याकडे माहिती कशी आली? अनिल परब हे खोटे बोलत आहेत का? मुंबई हायकोर्टाचा उल्लेख केला होता. न्यायालयीन प्रक्रियेत फेरफार केलाय का? यावर शंका उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली.